अहिल्यानगर - नाशिक येथे ५ ते ७ जुलै दरम्यान पार पडलेल्या १३व्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत प्रज्वल आनंद सत्रे याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने कांस्यपदक पटकावले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्वल सत्रेच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याच स्पर्धेत आर्यन सत्रे यानेही आपल्या खेळाची छाप पाडत सहभाग नोंदवला. या दोन्ही युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात लोकप्रिय आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते प्रज्वल सत्रे आणि आर्यन सत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
प्रज्वलच्या कठोर मेहनतीचे कौतुक करत संग्राम भैय्या जगताप यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आर्यन सत्रे यालाही भविष्यकाळात उत्तम कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला सचिनभाऊ जगताप, शैलेश गवळी, योगेश शेरकर, ओंकार जोशी, निलेश मदने, माणिकराव विधाते, सुहास शिरसाठ तसेच प्रज्वलचे वडील आनंद सत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी प्रज्वल आणि आर्यनच्या खेळातील योगदानाचे मनःपूर्वक कौतुक केले.
प्रज्वल सत्रे याने मिळवलेले हे कांस्यपदक वैयक्तिक यश नसून, संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. सातत्यपूर्ण सराव, कठोर परिश्रम आणि जिद्द यांच्या जोरावर प्रज्वलने हे यश संपादन केले आहे. यामुळे इतर युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या सत्कार समारंभांचे आयोजन अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे. अशा कार्यक्रमांमुळे युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्याची ऊर्जा मिळते.