राहाता (अहिल्यानगर) – सेंट जॉन स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंचा गौरव करण्यात आला आणि ज्ञानदीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संपूर्ण विद्यालयात ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र माहोल अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचे औक्षण करून, त्यांना पुष्पगुच्छ व पेन भेट देऊन आदरपूर्वक स्वागत करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महत्त्वावर प्रभावी भाषणे झाली.
यावेळी समर्थ गायकवाड, साक्षी पाथरकर आणि वेदांती दंडवते यांनी आपली मनोगते सादर करत गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मिळालेल्या यशाचा गौरव व्यक्त केला. दिनेश कडू यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना गुरूंच्या ऋणी राहण्याचा संदेश दिला.
यावेळी शिक्षकांसाठी काही मनोरंजक खेळही घेण्यात आले, ज्यात सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा निर्मळ आणि शांभवी रणभोर यांनी केले. अध्यक्षस्थानी फादर पॉली डिसिल्वा होते.
त्यांनी 'गुरू हे केवळ ज्ञानाचे नव्हे, तर संस्कारांचेही स्रोत आहेत', असे सांगून गुरूंच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख पाहुणे म्हणून फादर प्रमोद बोधक, सिस्टर टेरेजा आणि सिस्टर कैतना उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका सुमन माघाडे, शिक्षक अनिल वाघमारे, आनंद कोळगे यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शक म्हणून मिस मेरी जॉर्ज यांचे योगदान लाभले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरूंबद्दलचा आदर व प्रेम अधिक दृढ झाले आणि ‘गुरू म्हणजेच जीवनाचा दीपस्तंभ’ ही भावना प्रत्येक मनामध्ये जागृत झाली.