कधीकधी 'खरे हिरो' कॅप परिधान करत नाहीत, तर त्यांच्या गळ्यात स्टेथोस्कोप आणि मनात शांतता असते. गोवा येथून हैदराबादला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E6973 प्रवासादरम्यान अशीच एक अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली.
कोलकात्याला जाणाऱ्या एका प्रवाशाची पत्नी अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागली. ती अर्धचेतन स्थितीत होती, शरीर थरथरत होते आणि तिने अनेकदा अॅस्थमाचा इनहेलर वापरलेला होता. सकाळपासून काही खाल्ले नव्हते. त्यामुळे तिची तब्येत झपाट्याने बिघडत होती.
इंडिगो क्रूने त्वरीत ऑक्सिजन मास्क आणि सिलेंडर आणले, पण काळजी वाढत होती. अशा वेळी, काही रांगा पुढे बसलेल्या डॉ. सिमरनकौर वधवा यांनी पुढाकार घेतला. त्या नगरमधील प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंग वधवा यांच्या पत्नी आहेत.
कोणतीही भीती न बाळगता त्यांनी महिलेची तपासणी केली, घाबरलेल्या पतीला धीर दिला, तिच्या श्वासोच्छ्वासावर मार्गदर्शन केले आणि कमी साखरेची शक्यता लक्षात घेऊन गोडसर काळ्या कॉफीची विनंती केली.
केवळ १५ मिनिटांत परिस्थिती स्थिर झाली. जी महिला अर्धचेतन होती, ती पूर्ण शुद्धीत आली आणि हैदराबादला पोहोचल्यावर स्वतः चालत विमानातून उतरली.
क्रू सदस्य आणि महिलेच्या पतीने दिलेले 'आभार' हे शब्द अपुरे होते, परंतु जे मनात ठसले ते म्हणजे माझ्या पत्नीचे शांतपणे, समजूतदारपणे आणि अडथळ्यांमध्येही निर्धाराने केलेले काम.
एक पती आणि प्रवासी म्हणून मला अभिमान वाटतो की, माझ्या डोळ्यांसमोर ३५,००० फुट उंचीवर एका व्यक्तीच्या करुणेने आणि कौशल्याने दुसऱ्याचे आयुष्य बदलले, अशी प्रतिक्रिया हरजितसिंग वधवा यांनी व्यक्त केली आहे.
'गोंधळाच्या जगात खरी ताकद ही शांतपणे प्रकट होते' हे या प्रसंगाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.