अहिल्यानगर - अकोले तालुक्यातील कोतुळ येथे पोलिसांनी १,०१,७४,७५० रुपये किंमतीचा हिरा पानमसाला, रॉयल सुगंधीत तंबाखू व वाहने जप्त करत १४ आरोपींवर कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दि. १३ जुलै रोजी विशेष पोलिस पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे केळी रोड, कोतुळ येथील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला. शेडमध्ये व वाहनांमध्ये विक्रीसाठी साठवलेला गुटखा व सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणावर आढळला.
पोलिसांनी घटनास्थळी शोएब शाविद काझी, शाहिदहुसेन पटेल यांच्यासह एकूण १४ जणांना पकडले. ११० पोती हिरा पानमसाला (किंमत ४६.४६ लाख), ५० पोती रॉयल ७१७ तंबाखू (किंमत १०.५६ लाख), ७ वाहने (किंमत ४२.५० लाख), १३ मोबाईल फोन (किंमत १.४७ लाख) व ७५,३५० रुपये रोख रक्कम असा एकूण १.०१ कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस तपासात या गुटख्याचा साठा शेख नूर अब्दुल रऊफ व आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख या व्यक्तींनी पुरविल्याचे निष्पन्न झाले. यातील आतिक उर्फ डॉन फरार असून त्याचा शोध सुरु आहे.
याप्रकरणी अकोले पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००३, भारतीय न्याय संहिता व अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
पकडलेल्या आरोपींची नावे : शोएब शाविद काझी, शाहिदहुसेन लतीफ पटेल, मतीन शब्बीर शेख, जुबेर युनुस शेख, शहानवाज जावेद काझी, परवेज युनुस शेख, साद अन्वर तांबोळी, आतिक अन्वर शेख, शाहरुख जावेद काझी, सादिक इसानउल्ला पठाण, अमोल शरद जाधव, इम्रान रौफ शेख, शेख नूर अब्दुल रऊफ, आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख (फरार)
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व पोलिस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, आदींच्या पथकाने केली आहे.