मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आदेश दिला आहे.
त्यानुसार कोणीही वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या अथवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधू नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी एका लिखित आदेशाद्वारे हे निर्देश देत सांगितले की, पक्षातील कोणीही स्वखुशीने कोणत्याही माध्यमांशी संवाद साधू शकत नाही.
तसेच स्वतःच्या प्रतिक्रिया, मतमतांतरे किंवा कोणतेही वक्तव्य थेट सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, ज्या प्रवक्त्यांना अधिकृत माध्यमांशी संवाद साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांनी देखील राज ठाकरे यांच्याकडून पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करू नये, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हे आदेश येत्या काळात पक्षात अनुशासन आणि एकसंघ भूमिका टिकवून ठेवण्यासाठी दिले गेले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा अधिकृत आणि नियंत्रित संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे, हेच या मागचे प्रमुख कारण असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.