कोल्हापूर — हॉटेल पंचशील येथे दिनांक ६ जुलै रोजी 'राजर्षी शाहू महाराज : स्त्री उध्दाराचे अग्रदूत' या स्वप्नजा घाटगे लिखित ग्रंथाचे प्रकाशन डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. पाटील होते.
प्रकाशन प्रसंगी बोलताना डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, “राजर्षी शाहू महाराजांच्या स्त्री विषयक कार्याचा सखोल अभ्यास करून त्याचा परिचय करून देणारे हे पुस्तक लिहिणाऱ्या स्वप्नजा घाटगे या पहिल्या महिला ठरतात."
त्यांनी अतिशय प्रासादिक लयीमध्ये हा ग्रंथ लिहिला असून, इंद्रजित सावंत यांनी केलेले संपादनही स्तुत्य आहे.” या कार्यक्रमाची सुरुवात स्मित गायकवाड यांच्या स्वागताने झाली. प्रास्ताविक विद्या साळोखे यांनी केले.
प्रमुख वक्त्यांमध्ये आरती पाटील, वसंतराव मुळे व अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लेखिका स्वप्नजा घाटगे यांनी बोलताना सांगितले की, “राजर्षी शाहू महाराजांनी जे स्त्री सक्षमीकरणासाठी केले ते आजही मार्गदर्शक ठरते. त्यांच्या विचारांवर आधारित कायद्यांची आजही गरज आहे.”
या कार्यक्रमाच्या शेवटी सुजयसिंह शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित मान्यवरांनी ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित करत लेखिकेचे अभिनंदन केले.