येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - जिल्ह्यातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना मागील तीन महिन्यांपासून अपूर्ण धान्य पुरवठा मिळत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने योग्य कारवाईची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "गेल्या तीन महिन्यांपासून रेशन वितरणामध्ये असमानता दिसून येत आहे. दोन महिन्यांचे धान्य दिले जात आहे, परंतु तिसऱ्या महिन्याचे धान्य नाकारले जात आहे. यामुळे गरीब आणि सामान्य नागरिकांचे उपजीविकेचे महत्त्वाचे साधन प्रभावित होत आहे."
काही ठिकाणी दुकानदारांकडून रेशन कार्ड धारकांचे अंगठे (थंब) घेतले जात असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या शक्कलांमुळे रेशन वितरण प्रक्रियेत गैरव्यवहार होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, अनेक दुकानं वेळेवर सुरू न राहणे आणि दुकानदारांचा अनुपस्थिती यासारख्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
याबाबत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा प्रशासनाला तातडीने लक्ष घालून मनमानी करणाऱ्या दुकानदारांवर दहा दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. "जर प्रशासनाने यावर योग्य पावले उचलली नाहीत, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल," असा इशारा जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते योगेश गुंजाळ, हनीफ शेख, प्रवीण ओरे, सुधीर ठोंबे, रवी किसन जाधव, प्रसाद भिवसने, राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, अमर निरभवने, चरण हरबा, कैलास पगारे, कैलास काटे आणि प्रमोद भिंगारदिवे उपस्थित होते.
या निवेदनावर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर वंचित बहुजन आघाडी अधिक कठोर पद्धतीने विरोध करू शकते, असा इशारा दिला आहे.