अहिल्यानगर - शेवगाव शहरातील नगर रोड ते पंचायत समिती रोड यांना जोडणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
हा रस्ता थोर स्वतंत्रता सेनानी, माजी विधानसभा अध्यक्ष 'पद्मभूषण बाळासाहेब भारदे' यांच्या नावाने ओळखला जातो. मात्र त्याच्या नावाला साजेसा दर्जा या रस्त्याला अद्याप मिळालेला नाही.
त्यामुळे नगर परिषदेने तात्काळ लक्ष घालून या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबरोबरच नगर परिषदेकडून मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकीवर लावलेल्या शास्तीबाबत शासनाच्या अभय योजनेची अंमलबजावणी त्वरेने करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
बाळासाहेब भारदे हायस्कुल या रस्त्यालगतच आहे. खड्यांमुळे शाळेत येणारे विद्यार्थी, शिक्षक तसेच त्यांचे पालक यांना त्रासाला सामोरे जावे लागते. याच रस्त्यावर दोन हॉस्पिटल आहेत, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
या रस्त्याची बांधणीच्या वेळेसच गुणवत्ता व निकृष्ट कामाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते, त्यामुळे या रस्त्याची तात्काळ व दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना शिवसेनेचे अमर पुरणाळे, निलेश गायकवाड, सिद्धार्थ शेळके, निखिल खेडकर, अभिजीत गवते, साई पटेल, मनोज कांबळे, सिद्धू मगर, अशोक फुंदे, रेशम शेळके, अभिजीत झिंजूरके, सिद्धांत मगर, अजय मगर, शैलेश कसबे, संदीप ढाकणे, शरद गुगळे, संकेत गवळी, योगेश जोशी, प्रवीण लाहोटी, अजय भडके, सागर सुपारे आदी नागरिक उपस्थित होते.
या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ निर्णय घेण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. अन्यथा आंदोलन करण्याचा पवित्रा घ्यावा लागेल, असेही म्हटले आहे.