शेवगाव (अहिल्यानगर) - अविश्वसनीय संघर्ष, कमालीची अवहेलना आणि टोकाची उपेक्षा नियतीने वाट्याला देऊनही मनात कुणाबद्दलही कटुता न बाळगता सदैव जनसामान्यांचे हित जोपासणारे ऍड. कै. विजयराव काकडे हे स्वयंसिद्ध व्यक्तीमत्व हे वकिलांमधील संत होते, असे प्रतिपादन हभप संजय महाराज पाचपोर यांनी केले.
येथील सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व विधी क्षेत्रातील महान व्यक्तीमत्व असलेल्या कै. विजयराव काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त काकडे परिवारातर्फे दि. १० ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार नरेंद्र घुले, डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी आमदार पांडुरंग अभंग, हृषीकेश ढाकणे, प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर, हे उपस्थित होते.
तसेच यावेळी दिनकर महाराज अनचवले, ब्रह्मकुमारी पुष्पादिदी यांच्यासह शेवगाव पाथर्डी अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणे येथील सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते, नेते व जनसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ऍड. काकडे यांच्या जीवन चरित्रावरील 'वादळवाट' या माहिती पटाचे व 'दीपस्तंभ' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार राजळे म्हणाल्या, ' वैयक्तिक दुःख बाजूला ठेऊन पीडितांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे संवेदनशील आणि विवेकी व्यक्तिमत्व असलेले विजयराव काकडे हे अनेकांसाठी अनुकरणीय होते'.
डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आपल्या मनोगतातून काकडे यांच्या कार्याचे वेगळेपण नेमक्या शब्दात मांडले. कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे यांनी काकडे यांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव केला.
ऍड. युवराज काकडे व ऍड. अभिजित काकडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन दिलीप फलके व प्रा. ओंकार रसाळ यांनी केले तर आभार सुनीता आवरी यांनी मानले.
ऍड. सुभाष काकडे, ऍड. शिवाजीराव काकडे, डॉ. आकाश आवारे, नितीन काकडे व काकडे परिवाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
