अहिल्यानगर - नेवासा, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यांतील चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा व दरोड्याची तयारी अशा तब्बल 12 गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला डीचन त्र्यंबक भोसले (रा. सलाबतपुर) अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
नेवासा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बुधवारी अडीच किलोमीटर चिखलातून शिताफीने पाठलाग करून त्याला पकडले. सन 2011 पासून हा आरोपी गुन्हे करत असून, ४ वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. रात्री ऊस, केळी, डाळिंबाच्या बागांमध्ये लपणे, दिवसाढवळ्या शेतात राहणे अशी त्याची पळवाट होती.
सलाबतपुर पेट्रोल पंपावर मोटारसायकलला इंधन भरताना तो पोलिसांच्या नजरेस पडला. पण तितक्यात त्याने धूम ठोकली. मात्र पोलिसांच्या पाठलागातून तो सुटू शकला नाही. त्याच्याकडून पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
फिंगरप्रिंट तपासात तो सौंदाळा व तरवडी येथील घरफोडी प्रकरणांतही वॉन्टेड असल्याचे उघड झाले. या आरोपीकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, कॉन्स्टेबल नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव व सुनिल गंगावणे यांनी ही मोहीम फत्ते केली.