शेवगाव (अहिल्यानगर) - भारतीय संविधान जगात सर्वात सक्षम आणि श्रेष्ठ असून सर्वांना न्याय समता व विकासाच्या समान संधी मिळत आहेत, असे प्रतिपादन डॉ. नीरज लांडे यांनी केले.
अनुलोम संस्थेच्या वतीने आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी या उपक्रमात ते बोलत होते. यावेळी अनुलोमचे विभाग प्रमुख गणेश मोरे, अनुलोम मित्र राजेंद्र चव्हाण, प्रा. संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.
देशातील पददलित, वंचित घटकांचे कल्याण हा हेतू असलेले संविधान म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला व देशाला दिलेली अनमोल देणगी आहे. संविधानात बदल करायचा असल्यास तो अधिकार फक्त संसदेला आहे, असे डॉ लांडे यांनी सांगितले.
गणेश मोरे म्हणाले की, विद्यार्थी दशेतच संविधान, घटना, हक्क, कर्तव्ये याबाबत मुलांनी जागरूक राहिल्यास ते उत्तम नागरिक म्हणून पुढे येतील आणि हीच देशाची गरज आहे.
या कार्यक्रमास इयता नववी व दहावीच्या वर्गातील पाचशे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन मालानी यांनी केले तर सचिन शिरसाठ यांनी आभार मानले.