भारतीय समाजात मासिक धर्माविषयी अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आजही खोलवर रुजलेल्या आहेत. 'मासिक पाळीत स्त्री अपवित्र असते, ती मंदिरात जाऊ नये, पूजा करू नये,' असे विधान आजही अनेकदा ऐकायला मिळते. पण हे मत प्राचीन ग्रंथांमध्ये कुठेही लिहिलेले नाही.
दृष्टिकोन : वास्तविक, स्त्रीला शक्तीस्वरूप मानले आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता' : म्हणजे जिथे स्त्रियांना सन्मान मिळतो, तिथेच देवांचा वास असतो. त्यामुळे मासिक पाळीत स्त्री अपवित्र आहे, ही कल्पना काही जुन्या परंपरांवर आधारित आहे. ही मानवी सोयीसाठी घडवलेली मते आहेत.
सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोन : प्राचीन काळी मासिक पाळीच्या काळात महिलांना विश्रांती मिळावी म्हणून त्यांना कामांपासून दूर ठेवले जाई. पण कालांतराने ही विश्रांती 'अशुद्धता' म्हणून ओळखली जाऊ लागली आणि ती बंधनकारक झाली.
वैज्ञानिक दृष्टिकोन : मासिक धर्म हा स्त्रीच्या शरीराचा नैसर्गिक व आरोग्यदायी भाग आहे. या काळात हार्मोनल बदल होतात, शरीर थकते, म्हणून विश्रांतीची गरज असते. मात्र, पवित्र किंवा अपवित्र असा संदर्भ कुठल्याही ग्रंथात नमूद नाही.
बदलत्या काळातील नवा विचार : अनेक संत, योगगुरू आणि संस्था स्पष्टपणे सांगतात की, मासिक पाळीत स्त्री अशुद्ध नाही. दक्षिण भारतातील काही मंदिरांत तर देवीला मासिक धर्म येतो, असा उत्सवही साजरा होतो. उदा. कामाख्या मंदिर, आसाम.
सामान्य गैरसमज आणि सत्य :
- गैरसमज : पाळीत स्त्रिया अशुद्ध असतात.
- सत्य : ही नैसर्गिक प्रक्रिया असून यात अशुद्धतेचा प्रश्नच नाही.
- गैरसमज : पोषणयुक्त अन्न घेतल्याने त्रास होतो.
- सत्य : याउलट, आयर्न, प्रोटीन, कॅल्शियमयुक्त आहार फायदेशीर ठरतो.
- गैरसमज : मासिक पाळीतील रक्त दूषित असतं.
- सत्य : ते गर्भाशयाच्या अस्तराचं नैसर्गिक मिश्रण असतं.
- गैरसमज : पाळीत मुलींनी इतरांपासून वेगळं राहावं.
- सत्य : यामुळे न्यूनगंड निर्माण होतो; गरज आहे आधार आणि समजून घेण्याची.
समाजासाठी आवश्यक पावले :
- मुला-मुलींना योग्य शिक्षण देणे.
- पाळीबद्दल उघडपणे संवाद साधणे.
- स्वच्छता व आरोग्याच्या सवयींचा प्रसार करणे.
मासिक धर्म ही जीवनदायिनी शक्तीची प्रक्रिया आहे. आपण समजूतदार का नाही? स्त्रियांवर लादलेली अन्यायकारक बंधनं आता संपवण्याची वेळ आली आहे. विशेषत: स्त्रियांनीच स्त्रियांना या काळात आधार देणं, हीच खरी श्रद्धा आणि भक्ती ठरेल.
- पूजा सोळंके पठाडे (अहिल्यानगर)