- अॅड. उमेश अनपट
कोल्हापूरच्या
रस्त्यांवर हजारो नागरिकांनी एकत्र येत माधुरी (महादेवी) हत्तीनीला परत आणण्यासाठी काढलेली तब्बल 42 किलोमीटरची पदयात्रा
ही केवळ एका प्राण्याच्या मुक्तीसाठीचा लढा नाही, तर
अन्यायाविरुद्ध लोकशक्तीच्या उदयाचे प्रतीक आहे. तथापि या एकीच्या लढ्याच्या ताकती
समोर धनदांडग्या शक्ति, राजकारणी सरकार
झुकले असुल महादेवीच्या परतीचा मार्ग मोकळा होण्यास सुरुवात झाली आहे. हीच एकी महाराष्ट्रातील
लोकशाही मोडीत काढून जनतेला अक्षरशः नामोहरण करून सोडणाऱ्या राजकीय शक्ति विरोधात देखील
महाराष्ट्रातील जनतेने एकीची वज्रमुठीचा प्रहार करण्याची ‘हीच ती वेळ’.
कोल्हापुरातील घटना दाखवते की, जेव्हा लोक एकजुटीने रस्त्यावर उतरतात, तेव्हा त्यांची ताकद कोणत्याही सत्तेला आव्हान देऊ शकते. माधुरीच्या मुक्तीसाठी दाखवलेली ही एकी आता महाराष्ट्रातील भ्रष्टाचार, दुराचारी राजकारण आणि अनागोंदीविरुद्धच्या लढ्याचा पाया बनू शकते.
महाराष्ट्रातील अनागोंदिविरुद्ध लढा हवाच :.महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर यामुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. मंत्र्यांचे गैरव्यवहार, राजकारण्यांचे स्वार्थी धोरण आणि प्रशासनातील अनागोंदी यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरकरांचे एकत्र येणे हे एक नवे आशास्थान आहे. ही पदयात्रा दाखवते की, जनता आता गप्प बसणार नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि आपले हक्क मिळवण्यासाठी ती रस्त्यावर उतरेल.
लोकशाहीत
जनतेची एकी ही सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा लोक एकत्र येतात, तेव्हा कोणतीही सत्ता त्यांच्यासमोर टिकू शकत नाही. कोल्हापूरच्या या
घटनेने हे पुन्हा सिद्ध केले आहे. आता हीच एकी भ्रष्टाचार आणि दुराचाराविरुद्धच्या
लढ्याल बळकटी देण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा देईल. सर्वसामान्य माणूस
जेव्हा आपली ताकद ओळखतो, तेव्हा बदल अटळ असतो.
महाराष्ट्रातील जनतेने आता हीच ताकद वापरून भ्रष्ट प्रशासन आणि राजकारण्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. कोल्हापूरच्या पदयात्रेने दाखवलेला मार्ग हा केवळ माधुरीसाठीच नाही, तर एका नव्या, न्याय्य आणि पारदर्शी महाराष्ट्रासाठीच्या उद्यासाठीचा राजमार्गच आहे. हा लढा यशस्वी होण्यासाठी जनतेची एकी आणि सातत्यपूर्ण प्रयत्नच मोलाचे ठरतील.
त्यादृष्टीने कोल्हापूरच्या लढ्याची व्यापकता वाढवून महाराष्ट्रभर हे लोन पसरण्याची गरज आहे. त्यामुळेच माधुरी प्रमाणेच महाराष्ट्राची देखील कुप्रवृत्तीच्या विळख्यातून सुटका होण्यासाठीची मुहूर्तमेढ रोवली जाईल आणि लवकरच राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना देखील ‘सोनियाचा दिनू’ पहायला मिळेल, हे निश्चित.