बालपण.. बालपणातील सवंगडी खुप खेळायचो. सुट्टीच्या दिवशी तर दिवसभर कोठल्या जवळच्या डाक बंगला मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी. संध्याकाळी पुन्हा घरी येताना पाय मातीने माखलेले असायचे.
क्रिकेटची स्वप्नं.. मोठा खेळाडू बनण्याचं मित्रांसोबत एकत्रित स्वप्न... तू गावस्कर, मी विकेट कीपर. तू कपिल... असं बरंच काही.. बालपणीची ती मैत्री काही और होती ..
एसटी कॉलनीतील सारे दिवस आठवतात, डोळ्यासमोर येतात... सण, उत्सव, रंगपंचमी यात पुन्हा पुन्हा जगावंसं वाटतं. वाटू लागतं जावं पुन्हा कॉलनीत.. बोलवावं साऱ्या मित्रांना.. टॉस उडवावा, स्टंप लावावे.. मॅच खेळायला सुरू व्हावं.
दुपारी कधीतरी आईने जेवणासाठी हाक द्यावी... संध्याकाळ व्हावी.. रात्री पायरीवर मित्रांसोबत गप्पांची मैफिल रंगुन जावी.. मैत्रीतील निखळता पुन्हा तिथेच अनुभवण्यात काय मजा येईल नाही...
आज जो तो आपल्या उद्योगात, प्रपंचात... पुन्हा भेटावी सारी... सगळ्यांनी यावं, सुख दुःखाच्या गप्पा व्हाव्या.. आठवणींनी डोळे भिजावे.. घट्ट मिठी मारावी...
मित्र जीवनाचा भाग असतात. कॉलेजमध्ये, कंपनीत तशीच भरभरून प्रेम करणारी मित्र झाली. खूप जीव लावला त्यांनी. माझ्यासाठी भल्याचा गोष्टी सांगितल्या, प्रेम दिलं. आधार झाले...
ते होते... म्हणून मी आहे. माझं चांगलं व्हावं... ही मनस्वी इच्छा ठेवत माझ्या प्रत्येक सुख दुःखात ती होती, अनेक क्षणांची साक्षीदार आहेत ती.. सर्वस्व आहेत माझी... आज... पुढेही देवाने खूप चांगले मित्र दिले.. नशीबवान आहे यार मी...
- जयंत येलुलकर (अहिल्यानगर)