'मैत्री' म्हणजे दोन जीवांचे नातं, जिथे शब्दांपेक्षा भावना अधिक बोलतात... आणि अशा या नात्यातील 'अनमोल हिरा' म्हणजे माझा बालमित्र, स्व. नितीनभाऊ शेटे. आता तो फक्त आठवणींमध्ये उरला आहे, पण आजही प्रत्येक श्वासागणिक त्याचं अस्तित्व जाणवतं.
थोडीथिडकी नव्हे, तर आमची मैत्री तब्बल ४० वर्षांची. बालपणापासून सुरु झालेला हा प्रवास किती तरी आठवणींचा खजिना घेऊन आजही मनाच्या प्रत्येक कप्यात उजळून निघतो. शालेय जीवनात नितीनभाऊ म्हणजे धाडसी, खोडकर, प्रेमळ आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व.
क्रिकेट, हॉकी, पोहणे यामध्ये रमणारा, खेळांमध्ये नेहमी अग्रेसर. सुट्टी म्हणजे आमच्यासाठी मैदान आणि मित्रांचा गडगडाट. कुठलाही वाद झाला की नितीनच त्यावर शांत, परिपक्व आणि समजूतदार असा तोडगा काढायचा.
आमची शैक्षणिक वाटचाल MPS सोनई शाळेतून सोबतच सुरू झाली. पुढे नगर कॉलेज ते लोणी येथे सिव्हिल डिप्लोमा पूर्ण केला. तो शिक्षणात हुशार होताच, पण त्याचं खरं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे त्याचं संघटन कौशल्य.
सन २००८ साली प्रशांतभाऊंनी युवकांना एकत्र आणण्यासाठी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत नितीनभाऊने दिलेलं प्रभावी भाषण मला अजूनही लक्षात आहे. त्याच्या आत्मविश्वासामुळेच त्याला मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, आणि त्याने त्या यशस्वीपणे पार पाडून आपली छाप सोडली.
दि. २ फेब्रुवारी २००५ रोजी त्याचा विवाह मामाच्या मुलीशी झाला. तर १९ डिसेंबर २००८ ला त्याच्या घरी 'ओम'चा जन्म झाला. नितीन महादेवाचा भक्त म्हणून मुलाचं नावही त्याने भक्तिभावाने ओम ठेवलं. सन २०११ मध्ये तो शनैश्वर देवस्थानचा विश्वस्त बनला. आणि ती जबाबदारीही त्याने पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडली.
आमची मैत्री फक्त आमच्यापुरतीच नव्हती, तर पुढच्या पिढीतही ती जशीच्या तशी जपली गेली. माझा मुलगा राम आणि नितीनचा मुलगा ओम हे दोघेही आमच्या मैत्रीसारखेच एकमेकांचे जिवलग मित्र झालेत. ते एकाच शाळेत, एकाच शिक्षण संस्थेत शिकले. आणि आज नगरमध्येही सोबत शिक्षण घेत आहेत.
एक गोष्ट आम्ही दोघांनीही आयुष्यभर कटाक्षाने पाळली. ती म्हणजे.. ‘मैत्रीत राजकारण आणायचं नाही.’ आम्ही कधीही कोणतेही मतभेद होऊच दिले नाहीत. सणवार, उत्सव, आनंदाचे क्षण असोत वा संकटांची वावटळ.. आम्ही नेहमी एकत्र होतो.
नितीनचं बांधकाम व्यवसायातलं यश, नाव, मान-सन्मान हे त्याच्या कष्टाचं फलित होतं. मी जेव्हा व्यवसायात उतरण्याचं ठरवलं, तेव्हा नितीनभाऊची साथ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. खरं तर माझ्या यशामागेही त्याचाच मोठा वाटा आहे, हे मी कधीच विसरू शकत नाही.
आज नितीनभाऊ शरीररूपाने आपल्या सोबत नाहीत. पण त्याच्या आठवणी, त्याचा दिलखुलास स्वभाव, त्याचं समोरासमोर बोलणं, मनातलं स्पष्ट सांगणं.. हे सगळं आजही माझ्या हृदयात जिवंत आहे.
असा हा मैत्रीच्या दुनियेतील माझा कोहिनूर.. तो गेला असला तरी त्याच्या आठवणींचा हा प्रकाश माझ्या आयुष्याला सदैव उजळत राहील. यापुढेही प्रेरणा देत राहिल. स्व. नितीनभाऊ शेटे (एक अविस्मरणीय मित्र, सच्चा माणूस) यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
लेखक : अनिल दरंदले, शनिशिंगणापूर