शेवगाव (अहिल्यानगर) - बालविवाह ही समस्या मुलींच्या आणि राज्याच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोठा अडथळा आहे. त्यामुळे मुलींनी खंबीर भूमिका घेऊन स्वतःच्या तसेच इतरांच्या बाल विवाहाला प्रखर विरोध करायला हवा, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले.
येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुलमधील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थीनिंशी बालविवाह- कारणे व उपाय या विषयावर त्यांनी आज संवाद साधला.
यावेळी त्यांनी बालविवाहाचे मुलींच्या आयुष्यावर होणारे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक दुष्परिणाम व त्यावरील उपाय यांची विस्तृत माहिती दिली.
मुलींनी पदवी प्राप्त करेपर्यन्त सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर रहावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असेही ते म्हणाले. शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत मालिकेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विश्वस्त हरीश भारदे व प्राचार्य संजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक कन्हैय्या भंडारी यांनी केले तर आभार शहाजहान शेख यांनी मानले.
