पुणे – बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या तीन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये संलिप्त असलेल्या आरोपींना अटक करून, पुणे शहर पोलिसांच्या तपास पथकाने लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत चैन स्नॅचिंग, मोबाईल चोरी आणि ताशे चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे बाणेर पोलिसांचे कौतुक होत आहे.
मंगळसूत्र हिसकावण्याचा गुन्हा उघडकीस - दि. 11 जुलै 2025 रोजी सकाळी बालेवाडी येथील पर्ल सोसायटी गेट नंबर २ जवळ एका महिलेला पायी चालत असताना, काळ्या अॅक्टिव्हावर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता.
याबाबत बाणेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बाणेर पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट ४ यांच्या संयुक्त तपास पथकाने तब्बल ७४ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी शफिक मोदीन शेख (वय २६) आणि गौरव अनिल सरवदे यांचा शोध घेतला.
दोघांनाही अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आली.
मोबाईल हिसकावण्याच्या गुन्ह्यातील आरोपी अटकेत - दरम्यान, दुसऱ्या घटनेत बाणेर परिसरातील क्लीन हार्बरजवळ फिर्यादी रॅपीडो बुक करत असताना तिच्या हातातील १०,००० रुपये किंमतीचा विवो मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण आणि गुन्हेगारी पद्धतीचा अभ्यास करून पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आणि चोरी गेलेला मोबाईल जप्त केला.
ताशे चोरी प्रकरणात १२ ताशे जप्त - तिसऱ्या गुन्ह्यात, दिनांक २६ जून २०२५ रोजी पाषाण-सुस खिंड, नवचैतन्य हास्यक्लब परिसरातून एकूण ३० ताशे चोरून नेण्यात आले होते. यामध्ये वसिम हसिबुर शेख (वय २२) या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
त्याच्याकडून चोरीस गेलेल्या १२ ताशे जप्त करण्यात आले आहेत. यासाठी पोलिसांनी ४४ सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि तपास पथकाचा कौतुकास्पद कामगिरी : ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ ४ चे उपायुक्त सोमय मुंडे, खडकी विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
या कामगिरीत बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोनि (गुन्हे) अलका सरग, सपोनि कैलास डाबेराव, तसेच अधिकारी आणि अंमलदार नंदकुमार कदम, बाबा आहेर, किसन शिंगे, आप्पा गायकवाड, अतुल भिंगारदिवे, गजानन अवातिरक, अतुल इंगळे, प्रदीप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, विकास भोरे, रोहित पाथरुट यांनी सहभाग घेतला.