गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. दहा दिवस चालणारा हा सण समाजातील सर्व घटकांना एकत्र आणतो. मात्र, गेल्या काही दशकांपासून या सणामध्ये ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न अधिक तीव्र बनला आहे.
डॉल्बी, डीजे यांसारख्या आधुनिक साऊंड सिस्टीमच्या वाढत्या वापरामुळे तरुणाईला उत्साह वाटतो, पण त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण यांना याचा गंभीर त्रास होतो.
पिढ्यांचा बदलता उत्सव : आजचे ज्येष्ठ नागरिक जेव्हा तरुण होते, तेव्हाही त्यांनी सार्वजनिक सणांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. त्या काळीही ढोल-ताशा, झांज, भजन, गाणी असा कलात्मक जल्लोष व्हायचा.
तंत्रज्ञानाची प्रगती झाली, साधने बदलली, पण उत्सव साजरा करण्याची भावना तीच राहिली. त्यामुळे एका पिढीने दुसऱ्याच्या आनंदाला विरोध करण्याऐवजी परिस्थितीनुसार संवाद साधणे आवश्यक आहे.
आरोग्य आणि पर्यावरणाचा विचार व्हायला हवा. नवे तंत्रज्ञान आले म्हणून ते निःपरीक्षण स्वीकारणे योग्य नाही.
ध्वनीप्रदूषणामुळे –
- उच्च रक्तदाब, तणाव, हृदयविकार यांचा धोका वाढतो
- श्रवणशक्ती कमी होण्याची शक्यता असते
- वृद्ध, बालकं आणि रुग्ण यांना झोपेचे विकार होतात
- प्राणी-पक्ष्यांच्या नैसर्गिक जीवनावर दुष्परिणाम होतो
कायद्याचे भान : शासनाने ठरवून दिलेल्या डेसिबल मर्यादा आणि वेळेची बंधने ही फक्त औपचारिकता नाहीत. हे नियम सर्वांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आहेत. डीजे किंवा डॉल्बी पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसले, तरी त्यांचा नियंत्रित वापर ही प्रत्येक आयोजकाची जबाबदारी आहे.
समाधानाचा मार्ग :
- डीजे किंवा डॉल्बीचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवावा
- आवाजासाठी ठरवलेली वेळ काटेकोर पाळावी
- सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं, कीर्तन, भजन, वाद्यवृंद या पर्यायी उपक्रमांनाही प्रोत्साहन द्यावे
- तरुणांनी ज्येष्ठांचा विचार करावा आणि ज्येष्ठांनी तरुणांच्या उत्साहाला सकारात्मक दृष्टीने स्वीकारावे
शेवटचा संदेश : गणेशोत्सव हा एकतेचा आणि सामूहिक आनंदाचा उत्सव आहे. जर आपला आनंद दुसऱ्याच्या आरोग्यावर बोजा ठरत असेल, तर त्याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधून, परस्परांच्या भावना जपून आपण गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि सर्वसमावेशक करू शकतो.
- प्रतिभा सुनील शेलार (सातारा)
संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन

