शेवगाव (अहिल्यानगर) – “शाळा आणि शिक्षकांचे ऋण कधीही फेडता येत नाही. भारदे हायस्कूलमध्ये मिळालेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आमच्या आयुष्याची मजबूत पाया भरणी झाली,” अशा भावना व्यक्त करत भारदे हायस्कूलचे माजी विद्यार्थी तब्बल तेवीस वर्षांनी पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात भेटले.
पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल, शेवगाव येथे 2001-02 सालच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. 17 ऑगस्ट) उत्साहात पार पडला.
यावेळी प्रा. रमेश भारदे, हरीश भारदे, एकनाथ शिरसाठ, गोरक्षनाथ बडे, संजय कुलकर्णी, अमृत गोरे, उमेश घेवरीकर, सदाशिव काटेकर तसेच त्या काळातील वर्गशिक्षक रवींद्र गर्जे उपस्थित होते.
सर्व मान्यवर शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांकडून सत्कार करण्यात आला. याचबरोबर शाळेत कर्तृत्वाने नाव उजळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या स्नेहमेळाव्याचे संयोजन अभय शिंदे, विजय नलावडे, विनोद मोहिते, सचिन बाजीराव दौंड, निलेश भोंडे, मुजमिल पटेल, संदीप लवांडे, दुर्गा दीक्षित आणि डॉ. शीतल परदेशी यांनी केले.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेच्या सुवर्णक्षणांचा सोहळा अविस्मरणीय ठरला.
