पोळा (बेंदूर) : आपल्यासाठी राबणाऱ्या प्राण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस


'पोळा' वा 'बेंदूर' हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे. दक्षिण महाराष्ट्रात हा सण आषाढी पौर्णिमेला साजरा केला जातो. प्राचीन काळापासूनच आपला भारत कृषिप्रधान आहे, हे विख्यातच आहे.


सिंधु संस्कृतीमध्ये शेती हे एक उत्पन्नाचे, उपजिवीकेचे महत्त्वाचे साधन होते. त्या काळापासूनच बैल हे माणसाला उपयुक्त ठरलेले आहेत. भारतीयांचा महान पूर्वज असलेल्या शिवाचे वाहन नंदी आहे. हे या संदर्भात लक्षणीय आहे.

बैलाप्रमाने इतर अनेक पशुही प्राचीन काळापासूनच माणसाला वेगवेगळ्या मार्गांनी सहाय्य करीत आले आहेत. शिवाला 'पशुपती' असे गौरवाने म्हटले जाते. यावरून माणसाचे पशुंबरोबरचे जिव्हाळ्याचे आणि परस्पर सहकार्याचे नाते स्पष्ट होते.

विशेषत्वाने बैलांविषयी आणि त्या जोडीने इतर पशुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने 'पोळा' वा 'बेंदूर' हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. कृतज्ञता ही मानवी मनातील एक अत्युच्च उदात्त भावना आहे. म्हणूनच कृतज्ञचा हा सोहळा जपण्यासारखा आहे.

त्या दिवशी बैलांना विश्रांती तर दिली जातेच, पण इतर अनेक मार्गांनी त्यांना उत्तमोत्तम खाद्य देण्यापासून त्यांना विविधप्रकारे सजवणे, त्यांच्या मिरवणूका काढणे, इत्यादी गोष्टीही केल्या जातात. खरे तर, शेतकरी बैलांना फक्त पोळ्याच्या दिवशी विश्रांती देतो, असे नाही.

शेतकऱ्यांनी प्रत्येक आठवड्यातील एक विशिष्ट वार ठरवलेला असतो आणि त्या दिवशी औत जुंपले जात नाही. बैलांना विश्रांती दिली जाते. या नियमाचे पालन व्हावे, म्हणून त्यामागे एखादे धार्मिक कारण सांगितले असले तरी मूळ हेतू आपल्यासाठी राबणाऱ्यांना एक दिवस विश्रांती देणे हा असतो.

आधुनिक काळात शेतीसाठी बैलांची जागा घेणारी यांत्रिक साधने आली असल्यामुळे बैलांचे महत्त्व काही प्रमाणात कमी झाले आहे. तरी देखील खुप लोक शेतीसाठी त्यांची मदत घेत असतात. शिवाय शेतीला जोड म्हणून विविधप्रकारचे पशुपालनही आता पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात केले जाते.

पोळ्याच्या निमित्ताने या सर्व पशुधनाची योग्यप्रकारे काळजी घेण्याचे वेगवेगळे उपक्रम आयोजित करणे कालानुरूप आणि इष्ट ठरेल. आपल्याकडे पाळीव पशू असल्यास त्यांची योग्यप्रकारची निगा राखणे, गरजेचे आहे.

त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे, आवश्यकता असल्यास त्यांच्यावर योग्य उपचार करणे, या पशुंना सजवताना अपायकारक रंग वगैरेचा वापर टाळणे, यालादेखील महत्व आहे.
       
एकूणच या पशुंचे रक्षण, संवर्धन कसे करावे, या विषयीचे प्रबोधन करणे, असे उपक्रम राबवता येतील. ते केवळ एका दिवसापूरते मर्यादित न ठेवता, हे उपक्रम सातत्याने करीत राहणे हे शेतकर्यांच्या आणि पशुपालकांच्या एकूण विकासासाठी व निरामय आनंदासाठी हितकारक आहे.

त्याबरोबरच मानवाची केवळ सुखशांतीच नव्हे, तर त्याचे अस्तित्व देखील पर्यावरणावर अवलंबून असल्यामुळे केवळ पाळीव पशुंच्या बाबतीतच नव्हे, तर वन्य प्राण्यांच्या बाबतीतही संरक्षण, संवर्धन या दृष्टीने उपक्रम आयोजित करावेत.

त्याबरोबरच अशा प्राण्यांकडून मानवांच्या व पाळीव पशुंच्या जीवांना अपाय होऊ नये, शेतकर्यांच्या पिकांची नासाडी होऊ नये, यासाठी दक्षतेचे योग्य ते उपाय योजणे या गोष्टीच्या बाबतीतही प्रबोधन घडविणारे उपक्रम सातत्याने करीत रहावेत.

भारतीय माणूस सणांच्या माध्यमांतून प्राण्यांच्या प्रति, निसर्गाप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करत असतो. माणसाने आता माणसांप्रती कृतज्ञताभाव जागविण्याची गरज हल्ली भासू लागलीय हेही तितकंच खरंय..!

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
(सण, पक्वान्न आणि पर्यावरण या माझ्या पुस्तकातून)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !