काल लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये 'सावधान' हा मुग्धा गोडबोले-रानडे यांचा लेख वाचला. खरतर अंजन घालणारा लेख.. विषय तोच लग्न.. लग्न..
त्यात त्या मुलींच्या अपेक्षा (?) ची सतत वाजणारी वाजंत्री, मुलींवर, तिच्या आईवर ताशेरे ओढणाऱ्या सुशिक्षित (?) बायका, पुरुष यांच्या टुकार मनस्थितीवर मुग्धाने आपल्या सडेतोड लेखणीतून चपराक दिली आहे. अगदी उदाहरणासह..!
नवरा हयात असलेल्या बायांनी कंपलसरी सौभाग्यवती लिहायचं म्हणे, पुराणातील अगदी प्रांत:स्मरे नित्यम या अहिल्या, सीता, मंदोदरी, तारा, द्रौपदी, या पंचकन्यांनी सुध्दा सौभाग्यवती मंदोदरी रावण लंकापुरे असं नाव लिहिल्याचे आढळत नाही.
बायकांना सुध्दा राग येतो बरं. त्यांच्या नावापुढे सौ. लिहिलं नाही तर.. आपण नवऱ्यावर फारच प्रेम करतो की दुसरं काय? ह्याचे कारण कुणा पुरुषानेच हा सौभाग्यवती हा शब्द तयार केला असावा. स्त्रिया या गोंडस शब्दात विरघळून जातात आणि आपोआप पुरुषसत्ताक पद्धतीच्या वाहक बनतात.
अजूनही कोणी आपल्या नावामागे सौ. लावत नसेल तर ती स्त्री संस्कारहीन, संस्कृती भ्रष्ट आहे, असं मानणाऱ्याही बहुशिक्षित स्त्रियांचं आहेत. वैष्णवीसारख्या मुलीला कोण म्हणेल सौभाग्यवती? चांगले भाग्य तेही पुरुषाच्या हातात?
मुग्धा म्हणते, आजही बायका, मुलींना आपल्या नावामागे काय उपाधी लावावी, याच स्वातंत्र्य नसेल, तर आपण समाज म्हणून कुठल्या टप्प्यावर आहोत? हे स्वातंत्र्य प्रत्येकाला मिळायलाच हवे.
आता लग्न म्हणजे दिवसेंदिवस कठीण होत चाललेला विषय आहे. पूर्वीच्या काळी लग्न पत्रिकेत स्पष्ट चि./अमुकचा शरीरसंबंध चि.सौ.कां. अमुकशी जोडला आहे असं लिहिलं जातं असे. म्हणजे सारं काही स्पष्ट. मग कवि लेखकांनी यांचे अनेक उपमां, अलंकारिक विवाह पत्रिका तयार केल्या.
लग्न म्हणजे मुलीने घर सांभाळावे, मुले जन्माला घालावीत, त्यांचे इमान इतबारे संगोपन करावे, नवऱ्याने कमवून आणावं.. यात झाले काय घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, घरकाम याला शून्य प्रतिष्ठा आणि कमवून आणणारा घराचा मालक, असं चित्र समाज मनावर गेले शेकडो वर्षे कोरलेले आहे किंवा अगदी फिक्स झालेय म्हणा ना.!
एकदा नवऱ्याच्या घरात आली की तिला मारलं, झोडलं, तरी ती बापाच्या प्रतिष्ठेपायी परत जात नसे. बापाची प्रतिष्ठा फक्त लेकीनेच सांभाळायची का?भारतात रोज १७ बायका हुंडाबळीने मरतात. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे, यांचे खापर फक्त कमावत्या मुली, आणि त्यांच्या अपेक्षा यावर फोडून चालणार नाही.
मुलींना श्रीमंत नवरा नाही, तर मुलींना प्रेम आणि आदर महत्त्वाचा वाटत आहे. आता मुली नकार पचवून शेवटी कुणाच्या तरी गळ्यात हार घालून आयुष्यात हार मानून निमूटपणे संसार करायला लागतील, ही अपेक्षा करु नये.
त्याही माणूस आहेत, मन भावना असणारे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहेत, तर आता तरी त्या सन्मानाच्या हक्कदार आहेत. हे आपण समजून घ्यावे लागेल. आजपर्यंत मुलींना लग्नं या व्यवस्थेची चांगली बाजू फारच कमी दिसली आहे.
विवाह संस्था टिकवण्यासाठी तिला किंवा त्याला लग्न व्यवस्थेची चांगली बाजू दिसायला हवी, यासाठी समाज म्हणून आपण सावध असायला हवं.
चला, पटलं तर होय म्हणा.. नाहीतर मुलींना नावं ठेवण्यात महिलाच आघाडीवर आहेत, हे चित्र फारच निराशाजनक आहे. लग्न व्यवस्था टिकवायची असेल तर विचार करायला हवा.
- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)