शेवगाव (अहिल्यानगर) - संतांच्या जगण्यातून जीवन जगण्याची संकल्पना समजून घेतली तर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातील मोगरा नक्कीच दरवळत राहील. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची नैसर्गिक क्षमता ओळखायला हवी, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले.
येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळ आयोजित गंगा मृणालिनी स्मृती व्याख्यानमालेत बुधवारी (दि. १०) ‘मोगरा फुलला’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
याप्रसंगी गणेश शिंदे व माजी विद्यार्थीनी मनीषा बारगळ यांचा प्रा. रमेश भारदे, निमंत्रक हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिंदे पुढे म्हणाले, आपल्या कमाईतील काही वाटा समाजासाठी देण्याचा संस्कार घर आणि शाळेतून दिला गेला पाहिजे. त्या शिवाय वंचित घटकांचा उद्धार होणे शक्य नाही. याच हेतूने संत ज्ञानेश्वरांनी स्वतःसाठी नव्हे तर जगासाठी पसायदान मागितले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजश्री कुलकर्णी यांनी मानले. यावेळी श्यामला भारदे, रागिणी भारदे, सुषमा भारदे यांची विशेष उपस्थिती होती.
समारंभास पंचक्रोशीतील शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यानंतर उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचे व्याख्यान होणार आहे.