शेवगाव (अहिल्यानगर) : पत्रकारिता क्षेत्रातील निस्पृह व वस्तुनिष्ठ कार्याची दखल घेत एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना पहिला पद्मभूषण स्व. बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्काराची घोषणा भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. रमेश भारदे व निमंत्रक हरीश भारदे यांनी केली आहे.
पद्मभूषण स्व. बाळासाहेब भारदे हे थोर स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सव्यसाची पत्रकार व गांधीवादी विचारवंत होते. त्यांनी 1936 साली भारदे साक्षरता प्रसारक मंडळाची स्थापना केली होती.
त्यांच्या स्मृतीसाठी सुरू करण्यात आलेल्या या पुरस्काराचा पहिला मान राजीव खांडेकर यांच्या वाट्याला आला आहे. या पुरस्कारामध्ये रु. 25,000 रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे स्वरूप आहे.
शनिवार दि. 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. शेवगाव येथील भारदे हायस्कूलच्या रावसाहेब पटवर्धन सभागृहात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला खासदार निलेश लंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, शाळेचे गुणवान माजी विद्यार्थी व निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. पुरुषोत्तम भापकर (आयएएस) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.