शेवगाव (अहिल्यानगर) - स्वतःवर विश्वास असेल तर तळहातातील भाग्यरेषाही बदलता येते. गरज असते ती मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यांना न्याय देणाऱ्या शिस्तबद्ध नियोजनाची, असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केले.
भारदे साक्षरता प्रसारक मंडळ आयोजित गंगा मृणालिनी स्मृती व्याख्यानमालेत गुरुवारी झालेल्या चौथ्या पुष्पांतर्गत त्या 'झपाटलेपण ते जाणतेपण' या विषयावर मार्गदर्शन करत होत्या.
धानोरकर पुढे म्हणाल्या की, संयम, शिस्त आणि संस्कार ही आयुष्य आनंदात जगण्याची त्रिसूत्री असून मोबाईल व समाज माध्यमांपासून दूर राहिल्यास विद्यार्थी स्वतःची स्वप्ने नक्की पूर्ण करू शकतात.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे देत त्यांचे मन जिंकले. याप्रसंगी रागिणी भारदे व स्नेहा भारदे यांच्या हस्ते धानोरकर यांचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
तसेच शाळेचे गुणवंत माजी विद्यार्थी व वनक्षेत्रपाल आदिनाथ घनवट यांचा सत्कार प्रा. रमेश भारदे, निमंत्रक हरीश भारदे व प्रा. संजय कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा जोशी यांनी केले तर आभार नितीन मालानी यांनी मानले. या व्याख्यानाला पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. आता सायबरतज्ञ मुक्ता चैतन्य यांचे व्याख्यान होईल.