शेवगाव (अहिल्यानगर) - समाजात खऱ्या अर्थाने चांगले बदल घडवायचे असतील तर फक्त राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही, सज्जनांनी पुढे येऊन सक्रियपणे काम करणे गरजेचे आहे.
हा स्व. बाळासाहेब भारदे यांचा विचारच आज परिवर्तनाची खरी दिशा दाखवू शकतो,” असे प्रतिपादन एबीपी माझाचे संपादक व जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी केले.
येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचा पहिला स्व. बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार शनिवारी (दि. 13) आयोजित कार्यक्रमात खांडेकर यांना प्रदान करण्यात आला.
प्रा. रमेश भारदे, शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. पुरुषोत्तम भापकर व निमंत्रक हरीश भारदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्हाचा समावेश आहे.
पुरस्काराची रक्कम खांडेकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्थेकडे सुपूर्त केली. जान्हवी खांडेकर यांचा सत्कार रागिणी भारदे, मृदुला भारदे व स्नेहा भारदे यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमात नैतिक निकाळजे व अमोघ उरणकर यांनी साकारलेल्या राजीव खांडेकर यांच्या चित्रांचे विशेष कौतुक झाले. खांडेकर पुढे म्हणाले, युवकांच्या हातातील मोबाईल हे शस्त्र नसून संधी आहे.
संजय राठोड, अर्जुन देशपांडे यांच्यासारख्या युवकांनी मोबाईलच्या योग्य वापरातून करिअर घडवले आहे. त्यामुळे युवकांनी मोबाईलचा विधायक उपयोग करणे आवश्यक आहे.
पोलिस, पत्रकार आणि पुढारी हे तीन ‘प’ समाजात बदनाम झाले आहेत, याचा विचार करून या क्षेत्रातील लोकांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, पूर्वी गुंड पुढाऱ्यांकडे आश्रय घेत असत, आता गुंडच पुढारी बनले आहेत. गुंडांचे फोटो पोलीस स्टेशनमध्ये लावले जात, आता त्याच गुंडांचे फोटो फ्लेक्सवर झळकत आहेत.
अशा वेळी स्व. बाळासाहेब भारदे यांचा संतविचार व आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या समाजकारणाची गरज आहे. नागरिकशास्त्र हा विषय पालक व विद्यार्थी यांना शिकवणे आवश्यक आहे.
एआय हे पत्रकारिता व समाजमाध्यमांसमोरील मोठे आव्हान आहे. या कार्यक्रमात भारदे हायस्कुलच्या अमृत महोत्सवी वर्षाचे लोगो अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले, भारदे हायस्कुलच्या माझ्या शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांचा व समर्पणाचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. ही शाळा आजही राज्यातील आदर्श संस्था आहे.
यावेळी शेवगाव पत्रकार संघ तसेच विविध संस्था व व्यक्तींनी खांडेकर व डॉ. भापकर यांचा सत्कार केला. सूत्रसंचालन उमेश घेवरीकर यांनी केले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.