सातारा - वाई तालुक्यातील वेळे (जि. सातारा) येथील यशोधन ट्रस्टचे संस्थापक व सर्वेसर्वा रवी बोडके यांना भारतीय संविधान जनजागृती अभियानांतर्गत राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार यांच्या हस्ते देण्यात आला. यशोधन ट्रस्टच्या माध्यमातून सध्या १२५ हून अधिक निराधार, बेघर व वंचित लोकांना आश्रय मिळत असून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते.
आजवर ४०० ते ५०० लोकांना आरोग्यदृष्ट्या सक्षम करून पुन्हा आपल्या घरी परत पाठविण्यात आले आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सेवेसाठी बोडके यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजसेवक बोडके यांच्या कार्याबद्दल बोलताना प्रतिभा शेलार म्हणाल्या, आजच्या धावपळीच्या काळात आई-वडील, मुले यांचा सांभाळ लोकांना जड होतो; अशा परिस्थितीत रवी बोडके यांनी निराधारांचे बाबा म्हणून घेतलेली जबाबदारी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या कार्यातून प्रत्येकाला समाजसेवेची नवी दिशा मिळते. या कार्यक्रमाला साप्ताहिक सातारा दर्शनचे जाहिरात प्रतिनिधी रमेश काटकर, ज्येष्ठ समाजसेवक मुकुंद सुकटे व रोहित शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
