येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - श्री बाणेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात १ ऑक्टोबर २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर राखण्याबाबत शपथ घेण्यात आली.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जाधव व्ही. एम., परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुळे बी. एम., आय.क्यू.ए.सी. को-ऑर्डिनेटर प्रा. डॉ. शेख आर. एच. यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या विविध शासकीय योजना व कायद्यांची माहिती देत, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर भर देण्याची गरज अधोरेखित केली.
प्रा. डॉ. मुळे बी. एम. यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन हा केवळ एक दिवस नसून समाजात ज्येष्ठांचे स्थान आणि महत्त्व अधोरेखित करणारा प्रयत्न आहे. या दिवसाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करणे, त्यांच्या गरजांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांच्या हक्कांसाठी पाठिंबा दर्शवणे हा आहे.
संयुक्त राष्ट्रांनी १९९० मध्ये या दिवसाची स्थापना केली असून १९९१ पासून हा दिवस साजरा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा कीर्तने यांनी केले. भारतीय संस्कृतीत ज्येष्ठ नागरिकांचे स्थान मानाचे असल्याचे नमूद करत, ते परिवाराचा आधारवड व अनमोल ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
आई-वडिलांना दिलेली वागणूक पुढील पिढीकडून आपल्याला मिळते, हे लक्षात ठेवून ज्येष्ठांना सन्मान व आदर देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. या कार्यक्रमास बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते अक्षय दादा कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. सोनवणे यांनी आभार मानले.

