शेवगाव (अहिल्यानगर) - एकल महिलांनी आत्मसन्मानाला व्यावसायिक दृष्टीकोनाची जोड देत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन साऊ एकल महिला समितीचे अध्यक्ष हेरंब कुलकर्णी यांनी केले.
समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शेवगाव पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील एकल महिलांसाठी आयोजित सक्षमीकरण कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. कार्यशाळेस तालुक्यातील सुमारे दोनशे एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस गटविकास अधिकारी सोनल शहा यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंचायत समिती व उमेद विभागाद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देत त्यांनी महिलांच्या अर्थसाक्षरता, रोजगार निर्मितीची गरज आणि आर्थिक आत्मनिर्भरतेचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित महिलांची आरोग्य तपासणी तसेच महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित वारस नोंदी, आधार लिंक, शासकीय सहाय्याशी संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया कार्यशाळेनंतर प्रत्यक्ष ठिकाणीच करण्यात आली.
कार्यक्रमात उमेद प्रकल्पाचे जिल्हा सचिव सोमनाथ यांनी महिलांसाठी उपलब्ध योजनांची माहिती देत, स्व-सहायता बचत गट, उदरनिर्वाहासाठी शेळीपालन, घरगुती उद्योग, लघु व्यवसाय आणि त्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
नायब तहसीलदार नरेंद्र वाघमारे यांनी शासनाच्या वतीने एकल महिलांना मिळणाऱ्या अर्थसहाय्य योजना, कागदपत्रे व त्याविषयीची प्रक्रिया सुलभ भाषेत समजावून सांगितली.
संरक्षण अधिकारी प्रसाद शेळके यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या घरगुती हिंसाचाराची कारणे, कायदेशीर संरक्षण उपाय आणि उपलब्ध सरकारी सेवांविषयी माहिती दिली.
कार्यशाळेत मनीषा ससाणे (आखेगाव), आशा म्हस्के (अमरापूर) आणि मंगल काळे (घोटन) यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करून एकल महिलांसमोरील विविध सामाजिक, आर्थिक अडचणींचा वेध घेतला.
याप्रसंगी सावली संस्थेचे नितेश बनसोडे, कक्ष अधिकारी श्रीराम चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, शेवगाव एकल समितीच्या अध्यक्ष कल्पना दिवटे, अमोल घोलप यांची उपस्थिती होती.
या कार्यशाळेमुळे शेवगाव तालुक्यातील एकल महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक माहिती, सरकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ आणि मानसिक बळ मिळाले असल्याचे मत उपस्थित महिलांनी मांडले. अशी उपक्रमांची मालिका पुढेही सुरू राहावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
"मी बचत गटाच्या व उमेदच्या मदतीने शेळीपालन व इतर व्यवसाय सुरू केले. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि आज मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. याचे श्रेय शेवगाव पंचायत समिती व गटविकास अधिकारी सोनल शहा यांना जाते." — सविता कणसे (दिवटे), सहभागी एकल महिला
