अहिल्यानगर - श्री क्षेत्र मोहटा देवी देवस्थान (Mohta Devi Trust) येथे शांकभरी नवरात्र महोत्सवास पारंपारिक उत्साहात व वेदमंत्राच्या जयघोषात आरंभ करण्यात आला आहे.
श्री मोहटादेवी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने विश्वस्त ॲड. विक्रम वाडेकर व पुजा वाडेकर यांच्या हस्ते विधीवत महापुजा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक भक्तांनी भेट देवून देवीचे दर्शन घेतले आहे.
देवस्थानमार्फत वासंतिक, शारदीय व शाकंभरी अशी तीन नवरात्रे साजरी होतात. यावेळी शांकभरी नवरात्रोत्सवामध्ये रोज पारंपारिक उत्सव, त्रिकाल आरत्या, सुवासिनी पूजन, श्री सप्तशती पाठ वाचन, दररोज अर्जन, अन्नदान करण्यात येणार आहे.
यावेळी सकल भारतवासीय देवीभक्तांचे उत्तम आरोग्य व धनधान्य, सुख समृध्दी प्राप्त व्हावी आणि माणसांमध्ये ऐक्य, प्रेमभाव निर्माण व्हावा, असा संकल्प करून देवीला प्रार्थना करण्यात आली.
यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदिप घुले, कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे पौरोहित्य भूषण साकरे, भास्कर देशपांडे यांनी केले. या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता होमहवन, पूर्णाहुती शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
