शेवगाव (अहिल्यानगर) - येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील राष्ट्रीय छात्र सेनेचे (NCC) कर्तव्यदक्ष चीफ ऑफिसर मेजर भाऊसाहेब शिंदे यांना महाराष्ट्र राज्य एनसीसी ऑफिसर वेल्फेअर समितीतर्फे सन २०२५ चा सर्वोत्कृष्ट छात्रसेना अधिकारी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार दि. १४ डिसेंबर रोजी मुंबई येथील राष्ट्रीय छात्र सेनेच्या मुख्य कार्यालयात सेनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
मेजर शिंदे यांनी गेल्या २५ वर्षांपासून राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक व राष्ट्रउभारणीच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, बंधारे बांधणी, स्वच्छता अभियान, सद्भावना सायकल यात्रा, अमृत कलश अभियान आदी उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
तसेच प्रजासत्ताक दिन संचलनासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची निवड, राष्ट्रीय स्तरावरील शिबिरांसाठी छात्रसैनिकांची निवड यामध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे आजवर पन्नासहून अधिक विद्यार्थी पोलीस दल व सैन्य दलात भरती झाले असून, अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यांनी दिशा दिली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या यशाबद्दल प्रा. रमेश भारदे, हरीश भारदे, प्रा. संजय कुलकर्णी तसेच शाळेतील सर्व सहकाऱ्यांनी मेजर भाऊसाहेब शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
