गडचिरोली - 'मानवी हक्क' हा शब्द केवळ भाषणांपुरता मर्यादित न ठेवता तो कृतीतून जपला जाऊ शकतो, हे गडचिरोली पोलिसांनी नुकतेच जागतिक मानवी हक्क दिनी पुन्हा एकदा सिद्ध केले.
ना नातेवाईक, ना कुणाची साथ… तरीही एका बेवारस वृद्ध महिलेला सन्मानाने अखेरचा निरोप देत गडचिरोली पोलिसांनी माणुसकीचा खरा अर्थ समाजासमोर ठेवला.
चमेलीबाई आनंदराव कोरम (वय ७०, रा. चंद्रपूर, मूळ राह. छत्तीसगड) या वृद्ध महिलेला आयुष्यभर कष्ट करून घेतल्यानंतर थकलेल्या अवस्थेत दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास गडचिरोली बस स्थानकावर बेवारस अवस्थेत सोडून देण्यात आले होते.
याबाबत माहिती मिळताच गडचिरोली पोलीस ठाण्याच्या वतीने तातडीने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी तिची मनापासून काळजी घेत उपचार केले.
मात्र वृद्धत्व आणि आजारपणामुळे ती स्वतः हालचाल करू शकत नसल्याने कोणतेही वृद्धाश्रम किंवा सामाजिक संस्था तिला स्वीकारण्यास तयार नव्हती. अखेर उपचार सुरू असतानाच दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातच तिचे दुःखद निधन झाले.
मृत्यूनंतर तिच्या चंद्रपूर व छत्तीसगड येथील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र कुणीही भेटीस आले नाही, तसेच अंतिम संस्कारासाठीही येणार नसल्याचे स्पष्ट केले.
अशा वेळी 'मृत्यूनंतरही जेष्ठ नागरिकांचे मानवी हक्क जपले जावेत' या भावनेतून, जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधत गडचिरोली पोलिसांनी आणि नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तिच्या अंतिम संस्काराची जबाबदारी स्वीकारली.
दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी अत्यंत सन्मानाने तिच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम प्रवासाला खांदा देताना डोळ्यांत अश्रू होते, मनात वेदना होत्या; मात्र कर्तव्य आणि माणुसकीची जाणीव अधिक प्रबळ होती.
यावेळी गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस हवालदार योगेश कोरवते, पोलीस हवालदार अजय कोल्हे उपस्थित होते.
तसेच गडचिरोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पीदुरकर, वैभव कागदेलवार, आरोग्य विभागाचे राजू मधुमटके, स्वच्छता विभागाचे स्वप्निल निमगडे, मोरेश्वर मडावी, किशोर पोहनकर, किशोर मुनघाटे, सुकीराम मेश्राम, लोमेश देशमुख यांनीही अंतिम संस्कारासाठी मोलाचे सहकार्य केले.
'जीवन देणे आपल्या हातात नसते, पण मृत्यूनंतरही सन्मान देणे हा मनुष्य म्हणून आपला कर्तव्यधर्म आहे,' अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ही घटना आजच्या दिवशी समाजाला एक महत्त्वाचा संदेश देऊन जाते.
मानवी हक्क हे फक्त मोठ्या मंचांवर मांडण्यासाठी नसतात, तर त्या न बोलणाऱ्या, न मागणाऱ्या, दुर्लक्षित प्रत्येक जीवासाठीही असतात. चमेलीबाईंच्या आत्म्यास शांती लाभो, अशी भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी उपस्थितांनी अर्पण केली.
