लोणी (अहिल्यानगर) - येथील अजय ज्वेलर्स (Ajay Jwealers) या सराफ दुकानात अग्निशस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या कुख्यात गुंडाला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) अवघ्या 12 तासांत अटक (Arrest) करत मोठे यश मिळवले आहे.
या कारवाईत आरोपीकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा सुमारे 7.81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी लोणी (Loni) येथील अजय ज्वेलर्समध्ये फिर्यादी राजेंद्र ताराचंद नागरे (वय 54, व्यवसाय सोनार) हे असताना, त्यांचा ओळखीचा आरोपी बबन भाऊसाहेब घावटे (रा. श्रीगोंदा) व त्याचे तीन साथीदार स्विप्ट कारने (Swift Car) दुकानात आले.
मयत नातेवाइकाच्या खुनाचा बदला घेण्याच्या नावाखाली पैशांची मागणी करत, पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपींनी पिस्तुलाचा धाक दाखवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुकानातील काचेच्या ट्रेमधील पाच सोन्याचे नेकलेस, मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतले व फिर्यादीस मारहाण करून फरार झाले.
या घटनेप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे 28 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री बेलवंडी फाटा येथे सापळा रचून आरोपींची स्विप्ट कार अडवण्यात आली. यावेळी बबन भाऊसाहेब घावटे (वय 33) व कृष्णा पोपट गायकवाड (वय 35) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत गुन्ह्यात आणखी दोन आरोपी संकेत जाधव (रा. गोलेगाव, जि. पुणे) व करण खरात (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा) हे फरार असल्याचे निष्पन्न झाले.
- झडतीदरम्यान आरोपींकडून
- ५ मोबाईल फोन (किंमत ₹55,000),
- एक गावठी पिस्तूल (₹25,000),
- दोन जिवंत काडतुसे (₹1,400),
- गुन्ह्यात वापरलेली स्विप्ट कार (₹7,00,000)
- असा एकूण ₹7,81,400 चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मुख्य आरोपी बबन घावटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी यासह एकूण 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई देखील करण्यात आलेली आहे.
ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी लोणी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
