सरकारी कामात अडथळा; विश्वजीत कासार यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा


अहिल्यानगर - सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नामे विश्वजीत रमेश कासार (वय ३२, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा (Conviction) ठोठावण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. यु. जे. मोरे यांनी भा. दं.वि. कलम ३५३ अन्वये हा निकाल दिला.


या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. मंगेश वसंतराव दिवाणे व सरकारी वकील अनिल घोडके यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.

या घटनेची थोडक्यात हकिकत अशी की, दिनांक १५ फेब्रुवारी २०२० रोजी कोतवाली पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यांतील फरार (Absconded) आरोपी (Criminal) पुण्याहून नगरकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद मधुकर लव्हारे व शाहीद साकिब शेख यांना सापळा लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. मोबाईल लोकेशनच्या आधारे सुपा–सणसवाडी (Supa Sanaswadi) परिसरात शोध घेण्यात आला.

रात्री सुमारे ८.२५ वाजता सुपा टोलनाक्याजवळ (Toll Plaza) नगरकडून पुण्याकडे जाणारी विना नंबरची राखाडी रंगाची टाटा नेक्सॉन कार आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबविण्याचा इशारा देऊन स्वतः पोलिस असल्याचे सांगितले.

परंतु आरोपीने शिवीगाळ करत पोलिसांच्या तोंडावर व हातावर मारहाण करून दुखापत केली व डिव्हायडरच्या बाजूने भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने पळ काढला. यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल लव्हारे यांनी भा. दं.वि. कलम ३५३, ३३२, ५०४ व ५०६ अन्वये फिर्याद दाखल केली होती. सदर खटल्याचा तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी केला.

न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. सुपा टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज व इतर साक्षीपुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.

निकालात आरोपी विश्वजीत कासार यास भा. दं.वि. कलम ३५३ अन्वये दोषी धरून सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली, तर कलम ३३२ व ५०६ मधून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या खटल्याच्या कामकाजात पैरवी अधिकारी पो. कॉ. १५११ आर. डी. आडसुळ, पो.कॉ. सारीका रोकडे तसेच पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी सहकार्य केले.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !