येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - श्री बाणेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १६ सप्टेंबर २०२५ रोजी ‘अविष्कार’ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आपली संशोधन क्षमता व कल्पनाशक्ती सादर केली.
स्पर्धेपूर्वी शनिवार, २३ ऑगस्ट २०२५ रोजी अविष्कार स्पर्धा मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. प्रा. सोनवणे एस. आर. व डॉ. प्रा. वाघ यांनी विद्यार्थ्यांना संशोधन संस्कृती रुजवणे, नवनिर्मित व अकल्पित विचारांना प्रोत्साहन देणे तसेच शैक्षणिक प्रतिभा सादर करण्याच्या संधींचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शनामुळे प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पोस्टर व मॉडेल तयार करून स्पर्धेत सादर केली. स्पर्धेदरम्यान प्रमुख पाहुणे श्री विलास बोर्डे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मॉडेल व पोस्टरचे परीक्षण करून त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनांची सविस्तर मांडणी करत विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
ही स्पर्धा मूलभूत विज्ञान, वाणिज्य, कृषी विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय शास्त्र तसेच मानव व सामाजिक विज्ञान व भाषाशास्त्र अशा सहा विभागांत घेण्यात आली. परीक्षकांनी परीक्षण करून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांची झोनल स्तरासाठी निवड केली. परीक्षक म्हणून आयक्यूएसी को-ऑर्डिनेटर डॉ. शेख, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मुळे, डॉ. वाघ मॅडम, प्रा. दिवटे मॅडम व प्रा. आरेकर मॅडम यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्तने बी. एस. यांनी केले, तर प्रस्तावना डॉ. सोनवणे एस. आर. यांनी मांडली. प्रमुख पाहुणे विलास बोर्डे यांनी विविध शास्त्रज्ञांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबद्दल जागृती निर्माण केली. प्राचार्य डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मॉडेल व पोस्टरचे कौतुक करत, या संशोधनाचा समाजासाठी कसा सकारात्मक उपयोग होऊ शकतो याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते माननीय अक्षय दादा कर्डिले यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कीर्तने व्ही. एस. यांनी आभार मानले. या उपक्रमासाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

