येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीची खरी पायाभरणी. शहराचा विकास (Development), स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे इथेच ठरतात. मात्र दुर्दैवाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पैशांचा महापूर उसळलेला दिसतो. पैसा (Money Power) हा जणू यशाचा मापदंड बनत चालला आहे.
ज्या समाजकार्यकर्त्याने आयुष्यभर लोकांच्या सुख-दुःखात धाव घेतली, नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला, त्याच कार्यकर्त्याला निवडणूक लढवणेही अवघड झाले आहे. कारण समोर उभे आहेत धनदांडगे, ठेकेदारी मानसिकतेचे उमेदवार, ज्यांचे उद्दिष्ट समाजसेवा नसून सत्तेच्या माध्यमातून पैसा कमावणे हेच असते.
निवडणूक जर केवळ पैशांवर जिंकली जात असेल, तर सामान्य कार्यकर्त्याच्या प्रामाणिक कामाला काय किंमत उरते? समाजसेवेचा पराभव जर पैशांच्या जोरावर होत असेल, तर उद्या या शहराचे भवितव्य कोणाच्या हाती जाईल? अशा वेळी शहराची लूट होणार नाही तर काय होईल, हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ नागरिकाने स्वतःला विचारायला हवा.
मनापासून काम करणारा कार्यकर्ता ओळखण्याची जबाबदारीही जनतेचीच आहे. मतदार जर जागरूक आणि सुज्ञ असेल, तर तो पैशांच्या मोहाला बळी न पडता शहराच्या भवितव्याचा विचार करेल. कोणत्याही पक्षाचा असो वा अपक्ष, जो कार्यकर्ता जनतेच्या वेदना जाणतो, शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, अशालाच निवडून देणे ही काळाची गरज आहे.
पालिकेची ठेकेदारी करणारे, बोगस बिले करून पैसा कमविणारे ठेकेदार नगरसेवक शहराच्या प्रगतीचे शत्रू आहेत. अशा लोकांच्या हाती सत्ता गेली, तर विकासाऐवजी भ्रष्टाचाराचाच उदोउदो होतो.
म्हणूनच, शहराच्या हितासाठी तुमचे मत अनमोल आहे. ते योग्य व्यक्तीस दिल्यास शहराचा चेहरा बदलू शकतो. लोकशाहीत मतदार राजा असतो आणि हा राजा जर सजग असेल, तर शहराचे भविष्य उज्ज्वल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

