'अडल्ट सीन'चा अतिरेक : युवा पिढीच्या भविष्यावर घातक सावली


आजचे युग डिजिटल (Digital) आणि मनोरंजनप्रधान असले तरी चित्रपट हे केवळ करमणुकीचे (Entertainment) साधन राहिलेले नाही. ते समाजाच्या विचारसरणीला दिशा देणारे, मूल्यांची जडणघडण करणारे प्रभावी माध्यम (Impactful Medium) बनले आहे.

मात्र, अलीकडच्या काळात चित्रपटांमध्ये अतिरेकी अडल्ट सीन (Adult Scene), अश्लील संवाद आणि विकृत दृश्यांचा वाढता भडीमार होताना दिसतो. या प्रवृत्तीचा सर्वाधिक विपरीत परिणाम समाजातील युवा पिढीवर (Young Generation) होत असून, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

युवा पिढी ही समाजाच्या भविष्याची खरी ताकद आहे. परंतु सतत अशा दृश्यांच्या संपर्कात आल्यामुळे तरुणांच्या मनावर चुकीचे संस्कार रुजतात. प्रेम, नातेसंबंध (Relationship), स्त्री-पुरुष सन्मान याबाबत विकृत आणि अवास्तव कल्पना तयार होतात.

वास्तव जीवन (Reality) आणि चित्रपटातील काल्पनिक जग (Fantasy) यातील सीमारेषा धूसर होते. परिणामी, अनेक तरुण भावनिक अस्थिरतेला बळी पडतात आणि चुकीच्या निर्णयांच्या गर्तेत अडकतात. अडल्ट सीनमुळे लैंगिक कुतूहल वेळेआधीच जागृत होते.

याचा थेट परिणाम अभ्यासाकडे होणाऱ्या दुर्लक्षावर, एकाग्रतेच्या अभावावर आणि मानसिक अस्वस्थतेवर होतो. काही वेळा तरुण चित्रपटांमधील दृश्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात, ज्यातून सामाजिक तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचा धोका निर्माण होतो.

विशेषतः महिलांच्या संदर्भात ही समस्या अधिक गंभीर आहे. चित्रपटांमधील अडल्ट सीनमुळे महिलांना वस्तू (Product) म्हणून सादर करण्याची प्रवृत्ती वाढते. यामुळे समाजातील स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. स्त्री-सन्मान, सुरक्षितता आणि समानतेसारख्या मूलभूत मूल्यांना तडा जातो.

युवा पिढीमध्ये स्त्रीविषयीची दृष्टी चुकीच्या दिशेने वळणे हे समाजासाठी धोक्याचे लक्षण आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माते (Producers), सेन्सॉर बोर्ड (Sensor Board), पालक आणि संपूर्ण समाज यांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित होते.

चित्रपटांमधून सुसंस्कार, प्रेरणा, सामाजिक बांधिलकी, देशभक्ती आणि नैतिक मूल्ये रुजवली गेली पाहिजेत. केवळ लोकप्रियतेसाठी अडल्ट सीनच्या नावाखाली विकृती पसरवणे थांबले पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलांवर सजग लक्ष (Watch) ठेवून वयास अनुरूप आणि सकारात्मक मनोरंजन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी चित्रपटसृष्टीने आत्मपरीक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे. सुसंस्कृत, जबाबदार आणि मूल्याधिष्ठित मनोरंजनातूनच युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळू शकते आणि तेच सशक्त समाजाचे खरे लक्षण आहे.

- प्रतिभा सुनील शेलार (सातारा)
संस्थापिका, महालक्ष्मी आधार फाउंडेशन
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !