येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - राज्यातील अनेक ठिकाणी काँग्रेस (Congress) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aaghadi) एकत्र निवडणूक लढवत असल्याचे दावे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे करत असले, तरी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात हे दावे पूर्णतः खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा जोरदार आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
अहिल्यानगरमध्ये काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात कोणतीही युती (Alliance) किंवा आघाडी नसून, वंचित बहुजन आघाडी ही स्वबळावर आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
योगेश साठे यांनी सांगितले की, “अहिल्यानगरमध्ये काँग्रेससोबत कोणतीही राजकीय युती नाही. तरीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जाणीवपूर्वक चुकीची विधाने करून मतदारांची दिशाभूल (Missguided) करण्याचा प्रयत्न करत आहेत.” अशा खोट्या प्रचाराला वंचितचे मतदार बळी पडू नयेत, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचा लढा हा कोणत्याही पक्षाच्या सोयीसाठी नसून, थेट जनतेच्या प्रश्नांसाठी असल्याचे योगेश साठे यांनी ठामपणे सांगितले. शहरातील पाणी, घरकुल, बेरोजगारी, महागाई, दलित-वंचितांवरील अन्याय, महिलांचे प्रश्न यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सत्तेसाठी होणाऱ्या तडजोडी, पाठीमागच्या आघाड्या आणि खोटे दावे वंचितला मान्य नाहीत. अहिल्यानगरमध्ये आम्ही जनतेसमोर पारदर्शक आणि स्वाभिमानी राजकारण घेऊन जात आहोत, असेही साठे म्हणाले. या स्पष्ट भूमिकेमुळे महापालिका निवडणुकीआधीच काँग्रेस-वंचित युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

