अहिल्यानगर - महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीचे पाच नगरसेवक (Corporater) बिनविरोध निवडून आले आहेत. या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे (NCP Ajit Pawar) दोन तर भारतीय जनता पक्षाचे (BJP) तीन नगरसेवक आहेत.
भाजपकडून पुष्पा अनिल बोरुडे, करण कराळे आणि सोनाबाई शिंदे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुमारसिंह वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांनी विजय मिळवला आहे.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रभागनिहाय जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत विविध पक्षांमध्ये चर्चा सुरू होत्या.
मात्र, जागावाटपावरून मतभेद झाल्याने शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा (Competition) तीव्र झाली होती.
अशा परिस्थितीत पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात या निकालांची चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडींमुळे आगामी टप्प्यातील निवडणूक लढतीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

