कात्रड येथील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने केली सराईत टोळी जेरबंद


अहिल्यानगर - कात्रड (ता. राहुरी) येथे वृद्ध दाम्पत्यावर हल्ला करून जबरी चोरी (Robbery)  करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.


दांगटवस्ती, कात्रड येथे राहणारे फिर्यादी गजाबापु नाथु दांगट (वय ८५) हे २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री कुटुंबासह झोपले असताना चार अनोळखी आरोपींनी घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. धारदार हत्याराचा (Weapon) धाक दाखवून त्यांनी सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लुटला तसेच मारहाण केली.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नेवासा फाटा परिसरात सापळा रचला.

पोलिसांकडून रघुवीर विरुपन भोसले (वय १८) व दिनेश विरुपन भोसले (वय २३, दोघे रा. घासगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सखोल चौकशीत आरोपींकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri), पाथर्डी (Pathardi) व शेवगाव (Shevgaon) पोलीस ठाण्यांतील एकूण पाच जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रघुवीर भोसले याच्यावर यापूर्वीही अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो फरार होता.

ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !