अहिल्यानगर - प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांची मा. मुख्य न्यायमुर्ती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) पदावर निवड झाल्याबद्दल श्री मोहटादेवी देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
श्री शांकभरी नवरात्र महोत्सवाच्या (Shakambhari Navratri) पार्श्वभूमीवर त्यांच्या हस्ते श्री मोहटादेवीची (Mohata Devi) महापूजा व कुंकूम अर्चन संपन्न झाले. देवस्थानच्या वतीने न्यायमूर्ती शेंडे यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी देवस्थानचे विश्वस्त श्री बाबासाहेब दहिफळे, अॅड. विक्रम वाडेकर, अॅड. प्रसन्न दराडे, अशोक दहिफळे, श्रीकांत लाहोटी यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी न्यायमूर्ती शेंडे यांनी देवस्थानच्या विविध विकास कामांबाबत मार्गदर्शन केले.
देवस्थान समितीकडून विकास कामांसोबतच भाविकांसाठी दैनंदिन सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
धार्मिक व निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री मोहटादेवी हे तीर्थक्षेत्र राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. न्यायमूर्ती शेंडे यांनी श्री मोहटादेवी गडावर सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखपाल संदीप घुले, देवस्थानचे कर्मचारी तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
