श्रीरामपुर (अहिल्यानगर) - श्रीरामपूर शहरात झालेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी मोठी कामगिरी करत रेकॉर्डवरील दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. तर एक आरोपी मात्र अद्याप फरार आहे. या कारवाईमुळे श्रीरामपुर शहरातील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
अतिथी कॉलनी, वार्ड क्रमांक १, श्रीरामपुर येथे राहणारे मोहंमद रफिक शेख हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. २५ डिसेंबर २०२५ रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
लॉकर व कपाटातील सोनेाचे दागिने, रोख रक्कम, घड्याळ, तीन मोबाईल, एटीएम कार्ड व महत्त्वाची कागदपत्रे असा सुमारे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक माहिती व रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या आधारे तपास सुरू केला.
पोलिस पथकाने समीर शब्बीर शेख (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने जैद उर्फ सरफराज मुश्ताक सय्यद व विजय उर्फ खंडु इथापे (फरार) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर जैद उर्फ सरफराज यालाही अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
