नगर-पुणे लोकलचा प्रवास कागदावरच, नगरकरांचा संयम मात्र संपलाय.!

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

१९७७ सालापासून नगर-पुणे (Nagar Pune) स्वस्त, मस्त आणि फास्ट लोकल (Fast Local) सुरू होणार, अशी स्वप्ने नगरकरांना दाखवली जात आहेत. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक अर्थसंकल्प, प्रत्येक रेल्वे मंत्र्याचे भाषण : फक्त “हो हो, लवकरच” एवढेच उत्तर. पण प्रत्यक्षात २०२५ संपत आली, तरी हा प्रकल्प (Project) अजूनही कागदावरच अडकलेला आहे.

आता नव्याने हालचाली सुरू झाल्या असल्या, तरी हा प्रकल्प पूर्ण व्हायला किमान १० वर्षे लागणार, हे वास्तव आहे. या काळात सर्व राजकीय पक्षांनी काय केले? एकमेकांवर टीका, श्रेयासाठी भांडण (Credit) आणि जनतेचा वेळ व संयम वाया घालवणे, एवढेच. विकासापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व दिले गेले. परिणामी नगरकर आज राजकारण या शब्दालाच कंटाळले आहेत.

दुसरीकडे बीड-अहिल्यानगर रेल्वे प्रकल्पाकडे पाहिले तर काम वेगात झाले, रेल्वे सुरू झाली आणि आज फक्त ₹४० भाड्यात फास्ट सेवा उपलब्ध आहे. मग हाच न्याय नगर पुणे पिंपरी चिंचवड मार्गाला का नाही? सकाळी ६.३०, ७.००, ७.३० अशा वेळेला फास्ट लोकल सुरू होणे ही आज नगरकरांची मूलभूत गरज (Basic Need) आहे, लक्झरी (Luxury) नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर (Sangamner), लोणी (Loni), श्रीरामपूर (Shrirampur), शिर्डी (Shirdi), कोपरगाव (Kopargaon) या शहरांकडे विकासाचा ओघ वळतोय; पण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले अहिल्यानगर (Ahilyanagar) मात्र “भारतामधील सर्वात मोठे खेडे” (Village) बनवण्याकडे सर्वच पक्षांचा कल दिसतो. दर्जेदार शिक्षणसंस्था नाहीत, रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

डबल रेल्वे लाईनचे काम मुंगीसारख्या गतीने सुरू आहे, आणि नवीन रेल्वे मार्ग फक्त प्रस्तावांच्या पातळीवरच फिरत आहेत. आता विमानतळ होणार, अशी चर्चा आहे; पण त्याचा फायदा कोणाला? गर्भश्रीमंत, कोट्याधीश आमदार-खासदारांना. सामान्य नागरिक मात्र १९७७ पासून फक्त वर्तमानपत्र वाचत 'पुढच्या वर्षी होईल' या भ्रमात जगतोय.

२०२६ मध्ये उभा राहिलेला सामान्य नगरकर आज एवढेच म्हणतो, जगात भारी, अहिल्यानगरचे विचित्र राजकारण.! आता तरी सर्व पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, नगर-पुणे फास्ट लोकलचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. अन्यथा नगरकरांचा संयमच नाही, तर लोकशाहीवरील विश्वासही हळूहळू रुळावरून घसरेल, हे लक्षात घ्यावे.

- संजय बारस्कर, अहिल्यानगर

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !