अहिल्यानगर - संगमनेर (Sangamer) शहरात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) (एलसीबी) (LCB) धडक कारवाई करत कत्तलखान्यावर छापा टाकला.
या कारवाईत तीन आरोपींना रंगेहात ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ८ लाख ७० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक (DSP) सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गोवंशीय कत्तल व गोमांस विक्रीविरोधात कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक (PI) किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि (PSI) महादेव गुट्टे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दिनांक ४ जानेवारी रोजी संगमनेर शहरात गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जमजम कॉलनी, गल्ली क्रमांक ६ येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याचे समोर आले. पथकाने तात्काळ छापा (Raid) टाकून खात्री केली असता तिघे आरोपी कत्तल करत असल्याचे आढळून आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अब्दुल समद जावेद कुरेशी (वय २७), सकलेन जाकीर कुरेशी (वय ३०) आणि रेहान अल्ताफ शेख (वय २०) अशी आहेत. त्यांच्याकडून सुमारे २,९०० किलो गोमांस (किंमत अंदाजे ८,७०,००० रुपये) तसेच कुऱ्हाड, कासन व सुरी असा एकूण ८,७०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच प्राणी संरक्षण अधिनियमान्वये आरोपींविरुद्ध कारवाई सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहेत.
