येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
मुंबई - नवीन वर्ष 2026 ची सुरुवात सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या अनेक बदलांसह झाली आहे. 1 जानेवारीपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला असताना CNG आणि घरगुती PNGच्या दरात दिलासा मिळाला आहे. यासोबतच कारच्या किमती वाढणार असून रेल्वे आरक्षणासाठी आधार लिंक करणे बंधनकारक होत आहे.
आजपासून 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर तब्बल 111 रुपयांनी महागला आहे. दिल्लीत त्याची किंमत 1691.50 रुपये तर मुंबईत 1642.50 रुपये झाली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि लघुउद्योगांना बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, 12 जानेवारी 2026 पासून रेल्वे आरक्षणासाठी नवा नियम लागू होणार आहे. IRCTC खाते आधारशी लिंक नसलेल्या प्रवाशांना आरक्षित तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत तिकीट काढता येणार नाही. बनावट खात्यांद्वारे होणारे बुकिंग थांबवणे हा या निर्णयामागचा उद्देश आहे.
कार खरेदीदारांसाठीही नवीन वर्ष महाग ठरणार आहे. हुंडई, एमजी, निसान, रेनॉ, मर्सिडीज-बेंझसह अनेक कंपन्यांनी 1 ते 3 टक्क्यांपर्यंत किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढत्या इनपुट कॉस्ट आणि लॉजिस्टिक्स खर्चामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, CNG आणि घरगुती PNG वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. PNGRB ने गॅस वाहतूक शुल्क कमी केल्यामुळे CNG आणि PNGचे दर प्रति युनिट 2 ते 3 रुपयांनी स्वस्त होतील. तसेच, एव्हिएशन इंधनाच्या दरात मोठी कपात झाल्याने येत्या काळात विमान तिकिटे स्वस्त होण्याचीही शक्यता आहे.

