शहरी-ग्रामीण भेद संपवा, रंगभूमीसाठी एकत्र या : डॉ. सोमनाथ मुटकुळे

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

अहिल्यानगर - ग्रामीण भागातील नाट्यकलावंतांना सादरीकरण करताना प्रकाशयोजना, ध्वनी, नेपथ्य व इतर तांत्रिक बाबींमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी दूर करण्यासाठी ग्रामीण नाट्य संघांनी परस्पर सहकार्याची भूमिका घेत संघटितपणे काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, नाट्यदिग्दर्शक व समीक्षक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले.

जिल्ह्यातील ग्रामीण नाट्य संघांचा सहविचार मेळावा मनगाव (ता. नगर) येथील डॉ. राजेंद्र धामणे यांच्या आश्रमात नुकताच उत्साहात पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. मुटकुळे होते. मेळाव्याचे प्रास्ताविक डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील ग्रामीण नाट्य संघप्रमुख व तांत्रिक कलाकारांचा असा एकत्रित मेळावा प्रथमच होत असल्याने कलावंतांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. या मेळाव्यास दहा नाट्य संघप्रमुखांसह २२ कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

या मेळाव्यात कलाकारांनी मनोगत व्यक्त करताना बॅकस्टेज तंत्रज्ञानाच्या अडचणी, प्रशिक्षित तंत्रज्ञांचा अभाव, तसेच महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होताना येणाऱ्या समस्यांबाबत मोकळेपणाने भूमिका मांडली. 

अध्यक्षीय भाषणात डॉ. मुटकुळे यांनी ग्रामीण व शहरी असा भेद न करता सर्व कलावंतांना समान न्याय मिळाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. ग्रामीण नाट्यसंघांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण नाट्य महोत्सवांचे आयोजन, तसेच प्रत्येक तालुक्यात तंत्रज्ञ घडवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे व कार्यशाळा राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना डॉ. काशिनाथ सुलाखे पाटील म्हणाले की, हा उपक्रम केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरला पाहिजे. ग्रामीण नाट्य संघ एकसंघ राहिले, तरच त्यांच्या समस्या प्रभावीपणे सुटू शकतील.

दरम्यान, ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात डॉ. मुटकुळे यांच्या चार पुस्तकांचे व तीन नाटकांचे ब्रेल लिपीत प्रकाशन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुचित्रा धामणे व डॉ. राजेंद्र धामणे यांचाही सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला.

या सहविचार मेळाव्यास के. के. जाधव (शेवगाव), कैलास लोंढे (पारनेर), बाळासाहेब चव्हाण (नगर), श्रीकांत शिंदे (संगमनेर), प्रवीण घुले (अकोले), वसंत मंदावणे (कोपरगाव), दिनेश भाणे (संगमनेर), संजय हुडे (राहुरी), अशोक कर्ने (श्रीरामपूर), नवनाथ कर्डिले (श्रीरामपूर) उपस्थित होते.

तसेच शिवाजी पठारे (नगर), राजेंद्र जाधव (राहता), डॉ. उल्हास कुलकर्णी (अकोले), विनायक दहिवडा (अकोले), दिलीप क्षीरसागर (अकोले), सतीश मालवणकर (अकोले), डॉ. गोकुळ शिरसागर (शेवगाव), मफीज इनामदार (शेवगाव) आदी प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !