छत्रपती घडवणारी माता : स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ


१२ जानेवारी हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेलेला आहे. कारण याच दिवशी स्वराज्याच्या जननी, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या व घडवणाऱ्या महान मातृशक्ती.. राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांचा जन्म झाला.

त्या केवळ एका पराक्रमी राजाच्या माता नव्हत्या, तर संपूर्ण स्वराज्याच्या संकल्पनेमागील प्रेरणास्थान होत्या. सिंदखेडराजा येथील शूर सरदार लखुजी जाधवराव यांच्या कन्या असलेल्या जिजाऊंनी बालपणापासूनच शौर्य, स्वाभिमान, धर्मनिष्ठा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती आत्मसात केली होती.


त्या काळातील परकीय सत्तेची जुलमी राजवट, सामान्य जनतेवरील अत्याचार, स्त्रियांची होणारी अवहेलना आणि शेतकऱ्यांची पिळवणूक पाहून त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले गेले.

या स्वप्नाला आकार देण्यासाठी त्यांनी बाल शिवाजीला केवळ शस्त्रविद्या नव्हे, तर रामायण-महाभारत, संतपरंपरा, शूरवीरांच्या कथा आणि नीतीमूल्यांचे संस्कार दिले. “हे राज्य आपले असले पाहिजे, रयतेचे असले पाहिजे,” हा विचार शिवरायांच्या मनात खोलवर रुजविण्याचे महान कार्य जिजाऊ मातांनी केले.

शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जीवनातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर जिजाऊंचे मार्गदर्शन, संस्कार आणि प्रेरणा ठळकपणे दिसून येतात. धर्मनिष्ठा, न्यायप्रियता, स्त्रीसन्मान, जनतेचे रक्षण आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांमुळेच शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धा न राहता आदर्श लोककल्याणकारी राजा ठरले.

राजमाता जिजाऊ म्हणजे त्याग (Sacrifice), धैर्य, संयम (Patience) आणि दूरदृष्टी (Vision) यांचे मूर्तिमंत रूप. संकटांनी वेढलेल्या काळातही त्यांनी कधी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना केला आणि इतिहास (History) घडवणाऱ्या पुत्राला घडवले.

आजच्या काळातही राजमाता जिजाऊ प्रत्येक मातेसाठी, प्रत्येक समाजासाठी प्रेरणास्थान आहेत. सशक्त राष्ट्र घडवायचे असेल, तर आधी सुसंस्कृत पिढी घडवावी लागते, हे त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिले.

राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम (Salute). त्यांच्या विचारांचा वारसा जपत आपण सर्वांनी स्वाभिमानी, सशक्त आणि संस्कारक्षम भारत (India) घडवण्यासाठी योगदान देऊया.

- प्रतिभा सुनील शेलार (सातारा)
(संस्थापिका, महालक्ष्मी आधार फाउंडेशन)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !