स्वराज्य संस्थापिका राजमाता आऊँसाहेब जिजाऊ माता (Jijau Masaheb) यांची जयंती म्हणजे केवळ इतिहासातील एका महान स्त्रीला वंदन करण्याचा दिवस नव्हे, तर आजच्या समाजाने आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे.
सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा (Sindkhed Raja) येथे १२ जानेवारी १५९८ रोजी लखुजी जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या जिजाऊंनी केवळ एका पुत्राला जन्म दिला नाही, तर संपूर्ण स्वराज्याचा पाया घातला.
शहाजीराजे भोसले (Shahajiraje Bhosale) यांच्याशी विवाहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मात्र शिवाजी महाराज घडले ते जिजाऊंच्या संस्कारातून. बालपणापासूनच जिजाऊंनी शिवबांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवली.
“आपले स्वतःचे राज्य असायलाच हवे” हा विचार त्यांनी ठासून भरवला. घोडेस्वारी, तलवारबाजी, मैदानी खेळ यांचे प्रशिक्षण देत त्यांनी केवळ एक राजा नव्हे, तर गुलामगिरी मोडून काढणारा योद्धा घडवला.
ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती, त्या काळात मुघल सत्तेला आव्हान देणाऱ्या स्वराज्याची (Freedom) संकल्पना एका स्त्रीने रुजवली, ही बाब आजही थक्क करणारी आहे.
चिखलाच्या गोळ्याला घडवण्याचे सामर्थ्य जसे कुंभारिणीच्या हातात असते, तसेच समाज घडवण्याचे सामर्थ्य जिजाऊसारख्या मातेकडे असते. जिजाऊ नसत्या तर स्वराज्य नसते, आणि स्वराज्य नसते तर आपण आजही गुलामगिरीतच असतो, हे कटू सत्य आहे.
आजचा काळ वेगळा आहे. शिक्षण वाढले आहे, पण संस्कार कमी पडत आहेत. त्या काळात एकजूट होती, त्याग होता, प्रेम होते. आजची पिढी उच्चशिक्षित असली तरी माणुसकी, संयम आणि जबाबदारी यांची कमतरता प्रकर्षाने जाणवते. याचे मूळ घरातूनच घडणाऱ्या संस्कारांमध्ये आहे.
आजची आधुनिक जिजाऊ रिल्स, मोबाईल, सोशल मीडियात गुंतलेली दिसते. मुलांना वेळ देण्याऐवजी त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. काही मुलांना मोबाईलशिवाय जेवणही होत नाही, ही गंभीर बाब आहे. खरे तर सुसंस्कृत पिढी घडवण्याचे सामर्थ्य आजही एका आईकडेच आहे.
आजच्या जिजाऊंनी एकच ठरवायला हवे. आपल्या शहाजीराजांसोबत मिळून आपला शिवबा घडवायचा. मुलांकडे लक्ष देणे ही खूप मोठी जबाबदारी आहे. छंद, आवडी-निवडी जोपासाव्यात, पण त्याआधी मुलांचे भविष्य घडवणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा कमी असला तरी नियोजन, प्रेम, वेळ आणि संस्कार असतील तर परिवार नक्कीच सुसंस्कृत घडतो.
आगामी काळ कठीण आहे, हे आजूबाजूला दिसणाऱ्या परिस्थितीतून स्पष्ट होते. लाखो रुपये खर्च करूनही संसार टिकत नाहीत, नात्यांमध्ये ताण वाढतो आहे. याला थांबवायचे असेल तर आजच्या उच्चशिक्षित जिजाऊंनी पुन्हा एकदा जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घरातूनच समाज घडवण्याचे कार्य हाती घ्यावे लागेल.
स्वतः मोबाईलपासून दूर राहून, मुलांना वेळ देऊन, मूल्यांची ओळख करून दिली तरच उद्याचा शिवबा घडेल. जिजाऊंचा वारसा हा केवळ अभिमानाचा नव्हे, तर जबाबदारीचाही आहे.
शब्दांकन : आशा सुधीर साठे (सैनिक पत्नी, अहिल्यानगर)
