अहिल्यानगर शहर (Ahilyanagar) व उपनगरातील सामान्य नागरिकांच्या मनात आज एकच प्रश्न (Basic Question) घर करून बसला आहे.. आपण कर (Tax) भरतो, नियम पाळतो, पण बदल मात्र का दिसत नाही? शहरात रोज वाढणारी गर्दी, अपघात, खड्डे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे आता अपवाद राहिलेले नाहीत, तर दैनंदिन वास्तव (Reality) झाले आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी फिरती स्वच्छतागृहे (लेडीज व जेन्ट्ससाठी स्वतंत्र, पाण्याची सोय असलेली Toilets) उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. छोटा हत्ती किंवा 407 टेम्पोमध्ये अशी फिरती सुविधा असल्यास जागेचा प्रश्नच उरणार नाही. मात्र याकडे आजवर दुर्लक्षच झाले आहे.
रस्त्यांच्या बाबतीत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे. नवीन कामे मंजूर करून संपूर्ण अहिल्यानगर खड्डेमय करण्यापेक्षा, आधी अस्तित्वातील रस्ते खड्डेमुक्त व अपघातमुक्त करणे गरजेचे आहे. किमान ५ वर्षांची फ्री मेंटेनन्स व ७२ तासांत दुरुस्तीची लेखी हमी घेतल्याशिवाय कोणतेही काम सुरू होऊ नये.
जीवघेणे खड्डे, अवैज्ञानिक स्पीड ब्रेकर (Speed Breakers) आणि धोकादायक वळणे तातडीने हटवली पाहिजेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी शहर व उपनगरातील प्रमुख चौकांवर किमान १६ तास कार्यरत ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा (Automatic Signal) आवश्यक आहे.
त्याचबरोबर प्रत्येक सिग्नल व वळण रस्त्यावर पोलीस स्टेशनचे मोबाईल नंबर, शासकीय व स्वस्त उपचार देणाऱ्या हॉस्पिटल्सची (Hospital) माहिती स्पष्टपणे लावली गेली पाहिजे. नागरिकांना आपत्कालीन (Emergency Services) वेळी योग्य माहिती मिळणे हा त्यांचा हक्क आहे.
सिटी बस (City Bus) सेवाही नव्याने विचारात घेण्याची गरज आहे. पुण्यासारख्या शहरात मध्यवर्ती भागातून बस चालतात, मग अहिल्यानगरमध्ये छोटी, २०-२५ प्रवासी क्षमतेची बस सेवा का नाही? ३ नंबर स्टॅन्ड ते शेंडी (तारकपूर मार्गे) सिटी बस सुरू झाल्यास खासगी वाहनांवरील ताण नक्कीच कमी होईल.
घरपट्टीत थेट ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय हा नागरिकांवर अन्याय करणारा आहे. आधी सुविधा द्या, नियोजन सुधारा, मग करवाढीचा विचार करा. रस्ता तोडून ड्रेनेज व पाईपलाईन टाकली जाते, पण तो रस्ता पूर्ववत करणे ही जबाबदारी नक्की कोणाची, हा साधा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
आवाज उठवणाऱ्यांना वेडे ठरवणे किंवा खोट्या गुन्ह्यात अडकवणे हे लोकशाहीला शोभणारे नाही. अहिल्यानगरला 'भारतातील मोठे खेडे' म्हणून ओळखले जाण्यापासून वाचवायचे असेल, तर प्रशासनाने तात्काळ, ठोस आणि प्रामाणिक कृती करणे (Action Plan) हाच एकमेव मार्ग आहे.
- संजय बारस्कर (अहिल्यानगर)

