येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - पत्रकारांनी १५० वर्षांपूर्वीच्या पत्रकारितेतील विषय आणि आजच्या आधुनिक काळातील बदलती पत्रकारिता (Journalism) यांची सांगड घालून पुढे जाण्याची गरज आहे. पत्रकारितेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सोपवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून, नवोदित पत्रकारांना योग्य प्रशिक्षण (Training) व मार्गदर्शन (Guide) देण्यासाठी कार्यशाळा (Workshop) आयोजित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख (Bhushan Deshmukh) यांनी केले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शहरात मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) पत्रकारांच्या सन्मानाने साजरा करण्यात आला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके होते.
भूषण देशमुख यांनी सांगितले की, सध्या अपेक्षेप्रमाणे तरुण पिढी (Young Generation) पत्रकारितेत येताना दिसत नाही. जे नवीन पत्रकार येत आहेत, त्यांना अनुभवी पत्रकारांनी प्रशिक्षण देण्याची गरज असून, निवृत्तीच्या वाटेवर असलेले अनेक पत्रकार यासाठी योगदान देण्यास तयार आहेत. पत्रकारितेमध्ये डॉक्युमेंटेशनचे (Documentation) महत्त्व अधोरेखित करत संघटनांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
विठ्ठल लांडगे यांनी शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे अध्यक्ष सुधीर लंके व सदस्य विजयसिंह होलम यांच्या कार्याचे कौतुक केले. नगर जिल्ह्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळण्यासाठी जाचक अटी शिथिल करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला.
या कार्यक्रमास शासनाच्या अधिस्वीकृती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, नितीन पोटलाशेरु, रामदास ढमाले, महेश महाराज देशपांडे, सुदाम देशमुख, शिरीष कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, रमेश देशपांडे, दिलीप वाघमारे, राजकुमार कटारिया, सुभाष चिंधे, बंडू पवार, सचिन शिंदे, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार, वृत्तछायाचित्रकार व विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संजय सपकाळ व संजय चोपडा, तसेच फिनिक्स फाउंडेशनच्या (Finix Foundation) वतीने नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी पत्रकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश महाराज देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आफताब शेख यांनी मानले.
