शेवगाव (अहिल्यानगर) - ३ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा(ZP School), भास्कर वस्ती येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त माता-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रतीक्षा बेडके तसेच सामाजिक कार्यकर्ता (Social Activist) सुजाताताई खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा वाचन संस्कृतीच्या विकासासाठी पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनी आरोही बोडखे (इयत्ता दुसरी), स्वरा गिरजे (इयत्ता दुसरी) व मनस्वी रुईकर (इयत्ता चौथी) यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर वेशभूषा (Dressing) साकारत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी “वंचितांचे शिक्षण हेच प्रगतीचे लक्षण” या आशयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थिनी मनस्वी रुईकर हिने मागील वर्षी तालुकास्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. प्रतीक्षा बेडके यांनी उपस्थित भगिनींना आरोग्याविषयी मार्गदर्शन करून त्यांच्या विविध समस्यांवर उपयुक्त माहिती दिली. सुजाताताई खेडकर यांनी ‘उचल फाउंडेशन’च्या (Uchal Foundation) माध्यमातून निराधार तसेच ऊस तोडणी कामगारांच्या मुला-मुलींच्या संगोपन व शिक्षणासाठी केलेल्या कार्याची माहिती देत आपल्या प्रेरणादायी प्रवासाने उपस्थितांना भावूक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका आरती तागडे यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत शिंदे यांनी केले. त्यांनी सुजाताताई खेडकर यांच्या निराधारांसाठीच्या मायेच्या कार्याचा गौरव करत कार्यक्रमाचा समारोप केला व सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व महिला भगिनी यांनी लापशी-कढी-भात भोजनाचा आस्वाद घेतला. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करत आयोजित केलेला हा माता-पालक मेळावा प्रेरणादायी (Inspiring) ठरला.
